Gujarat civic polls : भाजपची मोठी आघाडी; आपची सुरतमध्ये मुसंडी, काँग्रेसला फटका

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) अपेक्षित यशाकडे वाटचाल केली असली तरी प्रथमच आम आदमी पार्टीनेही धडक दिली आहे. 

Updated: Feb 23, 2021, 02:22 PM IST
Gujarat civic polls : भाजपची मोठी आघाडी; आपची सुरतमध्ये मुसंडी, काँग्रेसला फटका
संग्रहित छाया

अहमदाबाद : गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) अपेक्षित यशाकडे वाटचाल केली असली तरी प्रथमच आम आदमी पार्टीनेही धडक दिली आहे. काही ठिकाणी 'आप'ने (AAP) चांगली कामगिरी केली आहे. तर काँग्रेसने (Congress) 50  जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. वडोदरा, राजकोट, जामनगर, अहमदाबाद येथे सत्तारूढ भाजपा पुढे आहे आणि 233 जागांवर आघाडी घेतली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal-led AAP) यांच्या नेतृत्वाखालील 'आप'ने प्रथमच चांगली कामगिरी केली आहे. (Gujarat civic polls : BJP leaders in Vadodara, Rajkot, Jamnagar, AAP ahead of Congress in Surat)

 'आप'ने सुरतमध्ये चांगली आघाडी मिळविली आहे. मंगळवारी गुजरातमधील सहा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल मतमोजणीला सुरुवात झाली. रविवारी अहमदाबाद, सूरत, राजकोट, वडोदरा, भावनगर आणि जामनगर या सहा महानगरपालिकांमध्ये मतदान झाले. या सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आहे. सकाळी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. अहमदाबाद, सूरत, राजकोट, वडोदरा, भावनगर आणि जामनगर या सहा नागरी संस्थांमध्ये रविवारी मतदान घेण्यात आले. या सर्व नागरी संस्थांवर सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप एकूण 268 जागांवर तर काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आहे. अहमदाबादमध्ये ओवेसी यांच्या तीन उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. तर सूरतमध्ये तब्बल आठ जागांवर 'आप'ने आघाडी घेतली आहे. सूरतमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूरत महापालिकेचे जे प्राथमिक निकाल हाती आले आहेत त्यानुसार 120 जागांपैकी भाजप आणि आपने समान म्हणजे आठ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने सहा जागांवर बाजी मारली. सध्या येथे भाजप 40 जागांवर तर काँग्रेस आणि आप प्रत्येकी 10 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

जामनगरमध्ये 64 जागांपैकी भाजपाने 12 जागा जिंकल्यात तर काँग्रेसने पाच जागांवर विजय मिळवला आहे. बसपानेही तीन जागा जिंकल्या आहेत. सूरतमध्ये  'आप'ला खातेही खोलता आलेले नाही. तर राजकोटमध्ये 72 पैकी 24 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. याठिकाणी काँग्रेसला मोठे अपयश आले आहे.

प्राथमिक निकालाचा कल पाहता या निवडणुकांमध्ये भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या गुजरात राज्यामध्ये भाजपलाच सर्व ठिकाणी सत्ता मिळेल असे चित्र दिसत आहे. मात्र या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. परुंत नवख्या आप आणि एमआयएमसारख्या पक्षांनी अनपेक्षितपणे या ठिकाणी विजय नोंदवल्याने त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसल्याचे चित्र दिसत आहे.