नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ डिसेंबर रोजी मतदान पार पडेल तर १४ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. गेल्या दोन दशकांपासून गुजरातमधील सत्तेत असलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
आता यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय नव्याने आल्याने भाजपसाठी आणखीन मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप याचा काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा करत आहे.
विश्लेषकांच्या मते, काही जातीय समूह आणि लहान व्यापारी 'नोटा' पर्यायाचा वापर करु शकतात जे जीएसटीमुळे भाजपच्या विरोधात आहेत.
२०१२च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये 'नोटा' पर्याय उपलब्ध नव्हता. तर, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय देण्यात आला होता. त्यावेळी गुजरातमधील ४ लाख २० हजारांहून अधिक मतदारांनी 'नोटा' पर्यायाचा वापर केला होता.
सध्याच्या स्थितीत सामाजिक आणि आर्थिक वर्ग सत्तेत असलेल्या भाजपवर नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा वर्ग 'नोटा' पर्यायाचा वापर करु शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत ४.२० लाख मतदारांनी हा पर्याय स्विकारला होता आताही अशाच प्रकारे 'नोटा' पर्यायाचा वापर केल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सत्तेत असलेल्या भाजपने दावा केला आहे की, 'नोटा' पर्यायाचा वापर यंदाच्या निवडणुकीत जास्त दिसणार नाही. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत याचा परिणाम दिसला नाही.