गुजरात पूल दुर्घटनेत पोल-खोल, न्यायालयात आणखी एक धक्कादायक खुलासा

Gujarat Morbi Bridge Collapse : आज न्यायालयात सुनावणीदरम्यान आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Updated: Nov 2, 2022, 10:37 PM IST
गुजरात पूल दुर्घटनेत पोल-खोल, न्यायालयात आणखी एक धक्कादायक खुलासा title=

अहमदाबाद : ब्रिटीश राजवटीत बांधला गेलेल्या मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. ओरेवा कंपनीच्या दोन व्यवस्थापकांसह चौघांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावलीये. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी सांगितले की, पुलाच्या दुरुस्तीचे कंत्राट घेतलेल्या कंपनीकडे ठेका घेण्याची क्षमताही नव्हती. दुरुस्तीमध्ये पुलाची केबल बदलण्यात आली नव्हती. त्यामुळे 135 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुरुस्ती करणारे कंत्राटदार हे काम करण्यास पात्र नसल्याचे देखील पुढे आले आहे. असं असतांना देखील 2007 आणि पुन्हा 2022 मध्ये त्यांना दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले. सुनावणी दरम्यान ओरेवा कंपनीचा व्यवस्थापक दीपक पारेख याने धक्कादायक वक्तव्य केलं. त्याने न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले की, देवाची इच्छा होती की हा दुर्दैवी अपघात होता.

गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील हा पूल 140 वर्ष जुना होता. अधिक भार आल्याने रविवारी सायंकाळी हा पूल तुटला. ज्यामध्ये 135 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 100 लोकांची क्षमता असलेल्या पुलावर 300 हून अधिक लोकं होती. दुरुस्तीनंतर ही पूल पडल्याने कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पीडितांची भेट घेतली. बचाव कार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.