'गुजरातला २२ वर्षांच्या विकासाची सीडी हवीये, २२ वर्षाच्या मुलाची नाही'

गुजरात निवडणुकांआधी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल आणि भाजपमधला वाद पेटला आहे.

Updated: Nov 15, 2017, 09:50 PM IST
'गुजरातला २२ वर्षांच्या विकासाची सीडी हवीये, २२ वर्षाच्या मुलाची नाही' title=

अहमदाबाद : गुजरात निवडणुकांआधी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल आणि भाजपमधला वाद पेटला आहे. हार्दिक पटेलची कथित सेक्स सीडी व्हायरल झाली आहे. यानंतर हार्दिक पटेलनं भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरातला २२ वर्षांच्या विकासाची सीडी हवी आहे, २२ वर्षांच्या मुलाची नाही, असं हार्दिक पटेल म्हणालाय.

 

हार्दिक पटेल सारख्या दिसणाऱ्या एकाची सेक्स टेप सोमवारी लीक झाली होती. या टेपमध्ये असलेली व्यक्ती हार्दिक पटेल असल्याचं सांगून ही टेप व्हायरलही करण्यात आली. दरम्यान हार्दिक पटेलनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. या व्हिडिओमध्ये दिसत असलेला तो मी नाही, असा दावा हार्दिक पटेलनं केला.

आता घाणेरड्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. मला बदनाम करून काहीही फरक पडणार नाही. पण हा गुजरातच्या महिलांचा अपमान आहे, असं ट्विट हार्दिक पटेलनं केलं. भाजपकडून बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोपही हार्दिकनं केला आहे.

मला बदनाम करण्यासाठी एखादी सेक्स टेप विरोधक व्हायरल करतील असं भाकीत हार्दिक पटेलनं काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर सोमवारी एक सेक्स टेप लीक झाली. यूट्यूबवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला पण थोड्याच वेळात हा व्हिडिओ काढूनही टाकण्यात आला.

१६ मे रोजी १० मिनीटांचा हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचं बोललं जातंय. सोमवारी दुपारी हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती हार्दिक पटेलसारखा आहे. एका हॉटेल रुमवर ही व्यक्ती एका महिलेसोबत सेक्स करताना शूट करण्यात आलं आहे. पण या व्हिडिओमधली व्यक्ती नेमकी कोण आहे याची अजूनही खात्री पटलेली नाही.

गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हार्दिक पटेलनं मोठं आंदोलन उभं केलं होतं. तसंच पाटीदार समाजाला भाजपनं इतक्या वर्षात आरक्षण दिलं नाही म्हणून भाजपला मत देऊ नका, असं आवाहन हार्दिक पटेलनं केलं होतं.