'देविंदर सिंग 'खान' असता तर RSS ने त्यांना सोडले नसते'

देविंदर यांचे आडनाव खान असते तर संघाकडून त्यांच्यावर तावातावाने आणि कठोर टीका झाली असती.

Updated: Jan 14, 2020, 04:37 PM IST
'देविंदर सिंग 'खान' असता तर RSS ने त्यांना सोडले नसते'

नवी दिल्ली: दहशतवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध पेटले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी या मुद्द्यावरून मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) लक्ष्य केले. देविंदर हे 'सिंग' ऐवजी 'खान' असते संघाच्या ट्रोल रेजिमेंटची प्रतिक्रिया वेगळी असती, असा टोला अधिर रंजन चौधरी यांनी लगावला. 

देविंदर यांचे आडनाव खान असते तर संघाकडून त्यांच्यावर तावातावाने आणि कठोर टीका झाली असती. रंग, पंथ आणि धर्म बाजूला ठेवून आपल्या देशाच्या शत्रुंचा निषेध करायला पाहिजे, असे अधिर रंजन चौधरी यांनी सांगितले. तसेच गेल्यावर्षी झालेल्या पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी देविंदर सिंग हेच काश्मीर खोऱ्यात उपअधीक्षक होते, याकडे चौधरी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

देविंदर सिंग हे सध्या श्रीनगर विमानतळावर विमान अपहरण विरोधी यंत्रणेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये आलेल्या परदेशी शिष्टमंडळाच्या आगतस्वागताची जबाबदारीही देविंदर सिंग यांच्यावर सोपवण्यात आली होती. गेल्यावर्षी राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही केला होता. 

मात्र, रविवारी स्थानिक पोलिसांनी त्यांना जम्मूजवळ दोन दहशतवाद्यांसोबत पकडले होते. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे २० वर्षांपूर्वी संसदेवर झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी अफजल गुरू याच्याशीही देविंदर सिंग यांचा संबंध होता. अफजल गुरूने त्याच्या जबानीत देविंदर यांचे नाव घेतले होते.