नवी दिल्ली - गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेला तरुण नेता हार्दिक पटेल याला आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आघाडी होण्याचे निश्चित झाली आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता याची औपचारिक घोषणा होणार आहे. त्यावेळी दोन्ही पक्षांमधील जागावाटपही जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. यावेळी वाराणसी या नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी हार्दिक पटेलला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे या ठिकाणी हार्दिक पटेलला उमेदवारी देणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी वाराणसीमधून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांनी हाच आपला मतदारसंघ राहिल, असे सांगत गुजरातमधील वडोदरा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून उभे राहिले होते. मोदी यांना वाराणसीमध्ये ५ लाख ८१ हजार मते पडली होती. तर केजरीवाल यांना दोन लाख ९ हजार मते पडली होती. गेल्या साडेचार वर्षांपासून या मतदारसंघात विविध विकासकामेही सुरू करण्यात आली आहेत. आता नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी सप आणि बसप एकत्र येत आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती शनिवारी लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली जाईल.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेनुसार ३७-३७ जागांवर दोन्ही पक्ष निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात या दोन्ही पक्षांकडून उमेदवार देण्यात येणार नाही. आणि उर्वरित चार जागा राष्ट्रीय लोकदल आणि अन्य पक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत.
वाराणसीमधून या दोन्ही पक्षांपैकी एकाचा उमेदवार उभा करण्यापेक्षा इतर ठिकाणच्या महत्त्वाच्या नेत्याला नरेंद्र मोदींविरोधात उभे करण्यासाठी विचार करण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी हार्दिक पटेल याच्या नावाचा विचार केला जात आहे. हार्दिक पटेल गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका मांडत आहेत. त्याचबरोबर देशातील विविध भागांमध्ये जाऊनही त्यांनी मोदींविरोधात भाषणे दिली आहेत. याचा विचार करून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.