दिवाळी बोनसचा सुपर 'पंच'! 'या' कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, 'कर्मचाऱ्यांच्या...'

Diwali Gift : एका फॉर्मा कंपनीच्या मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून चक्क कार भेट दिली आहे. दिवाळी अशा गिफ्टने गोड केल्याने कर्मचाऱ्यांनीही कंपनीच्या मालकाचे आभार मानले आहेत.

आकाश नेटके | Updated: Nov 4, 2023, 09:47 AM IST
दिवाळी बोनसचा सुपर 'पंच'! 'या' कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, 'कर्मचाऱ्यांच्या...' title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Diwali 2023 : दिवाळी (Diwali) जवळ आली असून सर्व नोकरदार मंडळी आपल्या कार्यालयातून दिवाळी भेटवस्तू (Diwali Gift) मिळण्याची वाट पाहत आहेत. दिवाळीच्या सणाला प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देते. या भेटवस्तूंमध्ये मिठाईपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश असतो. पण हरियाणातील (haryana) पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने (Farma Company) आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार भेट दिली आहे. एवढेच नाही तर या कंपनीने आपल्या ऑफिस बॉयलाही एक कारही भेट दिली आहे.

हरियाणातील या कंपनीने आपल्या 12 'सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्यांना' त्यांच्या  परफॉर्मन्ससाठी 7 लाख रुपयांची टाटा पंच कार दिवाळी भेट म्हणून दिली आहे. कंपनीच्या मालकाकडून हे आश्चर्यकारक दिवाळी गिफ्ट मिळाल्याने कर्मचारीही आनंदित झाले आहेत. आत्तापर्यंत, कंपनीच्या मालकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना कार किंवा घरे भेट दिल्याचे समोर आलं होतं. पण हरियाणात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची भेट मिळाली आहे. कंपनीच्या ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाहनांसह गाड्या भेट म्हणून मिळाल्या त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पंचकुलाच्या मिट्सकार्ट फार्मास्युटिकल कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळीची ही अनोखी भेट दिली आहे. कंपनीचे मालक एमके भाटिया यांनी ही भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे आज मी मोठ्या पदावर पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी मी माझ्या कर्मचार्‍यांना सांगितले होते की मी त्यांना कार भेट देईन. मी माझे वचन पूर्ण केले आहे. कार घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि मी माझ्या कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी ज्या कर्मचाऱ्यांना कार दिली आहेत त्यांनी कंपनीच्या सुरुवातीपासूनच माझ्यासोबत अहोरात्र काम केले आणि मला हा टप्पा गाठण्यात मदत केली. आता मी त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय देत आहे, असे एमके भाटिया म्हणाले.

कंपनीचे मालक भाटिया त्यांच्या एकाही कर्मचाऱ्याला कर्मचारी म्हणून बोलत नाहीत. ते प्रत्येक कर्मचाऱ्याला सेलिब्रिटी म्हणतात. मी कंपनीचा मालक नाही आणि माझ्यासोबत काम करणारे लोकही कर्मचारी नाहीत. मी कंपनीचा संचालक आहे आणि कर्मचारी माझे सेलिब्रिटी आहेत. मी कंपनीत कर्मचाऱ्यांनाही संचालक बनवतो. आशा आहे की, माझ्या या पावलाने इतर कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अशी पावले उचलतील, असेही  एमके भाटिया म्हणाले.

या भेटवस्तूची गंमत म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना गाड्या मिळाल्या, त्यापैकी काही कर्मचाऱ्यांना गाडी कशी चालवायची हेही माहीत नव्हते. यामध्ये अनेक महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता आपण कार चालवायला शिकत आहोत, असे कर्मचारी सांगतात. कंपनीच्या मालकाने आपला आनंद आमच्यासोबत वाटल्याने आम्ही आणि आमचे कुटुंबीय खूप आनंदी आहोत, असे कर्मचारी सांगतात.