सोशल मीडियात 'त्या' कमेंट करणाऱ्यांनो सावधान

सध्याच्या काळात लहान-लहान गोष्टींवरही अनेकजण ट्रोल करण्यास सुरुवात करतात

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 15, 2017, 05:44 PM IST
सोशल मीडियात 'त्या' कमेंट करणाऱ्यांनो सावधान title=
Representative Image

नवी दिल्ली : सोशल मीडिया असं एक प्लॅटफॉर्म बनलं आहे जेथे प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील लहान-मोठ्या गोष्टी शेअर करतो. मात्र, सध्याच्या काळात लहान-लहान गोष्टींवरही अनेकजण ट्रोल करण्यास सुरुवात करतात.

इतकेच नाही तर काही युजर्स आपल्या मर्यादा ओलांडत चुकीच्या टिप्पणीसुद्धा करतात. मात्र, आता अशा प्रकारे चुकीची टिप्पणी करणं सोशल मीडिया युजर्सला चांगलचं महागात पडणार आहे. सोशल मीडियात अपशब्द वापरत टीका करणाऱ्यांवर लगाम लावण्याची केंद्र सरकारने तयारी केली आहे.

एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियात लिहीलेल्या कंटेंटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या, अफवा पसरवल्या किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल असं काही लिहीलं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. अशा व्यक्तींना तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

इतकेच नाही तर जर एखाद्या व्यक्तीने असे वादग्रस्त कमेंट किंवा कंटेंट फॉरवर्ड केले तर त्या व्यक्तीलाही शिक्षा होणार आहे. यासाठी वेगळा कायदा बनवण्याऐवजी सध्या असलेल्या आयपीसी आणि आयटी अॅक्ट २००० मध्ये बदल करण्याची तयारी सरकारने केली आहे.

या प्रकरणी कायद्यात कुठल्या प्रकारे बदल करण्यात येऊ शकते याबाबत १० तज्ञांची टीम सरकारला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर या अहवालावर चर्चा करुन तो केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.

ऑनलाईन अफवा पसरवणाऱ्यावर आणि वाईट टिप्पणी करणाऱ्यावर आयपीसी १५३सी अंतर्गत कारवाई करण्यात येईल. या अंतर्गत जात, धर्म, भाषा, लिंग याच्याआधारे कुणाला धमकी दिली किंवा चुकीची टीका केली तर ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते. तसेच ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.