पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा आणखी एक जवान शहीद

एकाच आठवड्यात कोल्हापूरचे २ जवान शहीद

Updated: Nov 21, 2020, 02:07 PM IST
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा आणखी एक जवान शहीद

मुंबई : संपूर्ण जगात दहशत पसरविणारा देश, पाकिस्तान सुधरण्याचं नाव घेत नाहीये. शनिवारी पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन केले ज्यामध्ये एका भारतीय जवान शहीद झाला. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अचानक गोळीबार सुरू झाला, ज्यामध्ये सैन्य हवालदार संग्राम शिवाजीन पाटील शहीद झाले.

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना राजोरी इथं वीर मरण आलं. भारतीय सैन्यात संग्राम पाटील हे हवालदार पदावर कार्यरत होते. एका आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये युद्धबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबार केला. पाकिस्तानने केलेल्या या गोळीबारात एक भारतीय सैनिक शहीद झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

पाकिस्तानमधून दहशतवादी हालचाली नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. नगरोटा येथील पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता, परंतु त्यांचा कट भारतीय सुरक्षा दलांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी उधळला.