close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सोनिया गांधींचं जेटलींच्या पत्नीला भावनिक पत्र

जेटलींनी निष्ठूर आजाराशी मोठ्या धैर्याने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने सामना केला.

Updated: Aug 25, 2019, 10:09 AM IST
सोनिया गांधींचं जेटलींच्या पत्नीला भावनिक पत्र

नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. राजकारणात जेटली यांचे सर्वपक्षीय संबंध होते. विरोधी पक्षांतील नेत्यांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. 

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी जेटलींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. एवढेच नव्हे तर सोनियांनी अरूण जेटली यांनी पत्नी संगीता जेटली यांनाही एक पत्र लिहले आहे.

या पत्रात सोनिया गांधींनी म्हटले आहे की, अरूण जेटली यांनी राजकारण आणि इतर क्षेत्रांमध्ये नेहमीच मित्र आणि प्रशंसक कमावले. तुमच्या पतीच्या निधनाची बातमी ऐकून मला अतीव दु:ख झाले आहे. जेटलींनी निष्ठूर आजाराशी मोठ्या धैर्याने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने सामना केला, असे सोनियांनी पत्रात म्हटले आहे. 

तसेच अरूण जेटली यांनी पदोपदी स्वत:ची प्रखर बुद्धिमता आणि उत्तम वक्तृत्व सिद्ध केले. मग ते अर्थमंत्रीपद असो किंवा वकिली. या दु:खाच्या क्षणी माझे शब्द थिटे पडतील. मात्र, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की, मी तुमच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. अरूण जेटली यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे सोनियांनी म्हटले आहे.

अरूण जेटली यांच्यावर आज दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काल जेटली यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून कैलाश कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी जेटलींचे अंत्यदर्शन घेतले.