नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या राजवटीवर टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर ममता बॅनर्जी यांनी पलटवार केला. राहुल गांधी तर अजून बच्चा (लहान) असल्याचा टोला ममतांनी हाणला. राहुल गांधी यांनी स्वत:चे मत मांडले. मला त्याविषयी भाष्य करायचे नाही. ते अजून बच्चा (लहान मूल) आहेत. मी त्याबद्दल काय बोलणार? यावेळी ममतांनी राहुल यांनी घोषणा केलेल्या किमान वेतन हमी योजनेसंदर्भात भाष्य करण्यासही नकार दिला.
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मालदा येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. भाजप आणि तृणमूल दोन्ही पक्ष आपापली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या काळात पश्चिम बंगालचा कोणताही विकास झालेला नाही. ममता बॅनर्जी यांचा कारभारही नरेंद्र मोदी यांच्यासारखाच आहे. हे दोन्ही नेते कोणाचाही सल्ला ऐकत नसल्याचे राहुल यांनी म्हटले होते.
ममता आणि राहुल यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे आता महाआघाडीचे काय होणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. महाआघाडीत सर्व विरोधी पक्षांना सामील करुन घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण ममता बॅनर्जी हे राहुल यांचे नेतृत्व स्वीकारणार नसल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.