मध्य प्रदेश : टेक्नोलॉजी बदलतं गेली. चेकबुक पाठोपाठ क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आलं. आता हे ही जुनं झालं. नव्या टेक्नोलॉजीच्या दुनियेत फोन पे, गुगल पे, QR कोड अशी माध्यमं पैशांचे व्यवहार करण्यासाठी आली.
आताच्या जमान्यता साधी दुधाची पिशवीही आणायची झाली तरी लोकं पेटीएम, फोन पे, गुगल पे याचा वापर करतात. बँकेत रांगेमध्ये उभे राहून पैसे काढण्यासाठी लावावी लागणारी रांग या कटकटीतून सर्वांची सुटका झाली आहे.
या सर्वात मोठी अडचण होत आहे ती भिक्षेकरी यांची.. कुणाकडे सुट्टे पैसे असतात, नसतात आणि ज्यांच्याकडे असतात ते या भिक्षेकऱ्यांना पैसे देतीलच असे नाही. यावर मात करण्यासाठी छिंदवाडा येथील एका भिक्षेकऱ्यानं एक नवा फंडा अंमलात आणलाय.
हेमंत सूर्यवंशी असं या भिक्षेकऱ्याचं नाव आहे. हा भिक्षेकरी आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने भीक मागतोय. भीक मागण्यासाठी त्यांनी थेट फोन पे, गुगल पे आणि QR कोड यांचा वापर करण्यास सुरवात केलीय.
हेमंत सूर्यवंशी यांना लोक हेमंत बाबा नावाने ओळखतात. ते पूर्वी महापालिकेत नोकरीला होते. नोकरी गेल्यानंतर अनेक दिवस ते नैराश्यात होते. त्यांची मानसिक परिस्थिती बिघडली आणि ते रेल्वे स्टेशन, फाउंटन चौक, गांधी गंज या ठिकाणी भीक मागू लागले.
बदलत्या परिस्थितीनुसार त्यांनी आता डिजिटल माध्यमाचा वापर करण्यास सुरवात केली आहे. डिजिटल पेमेंटद्वारे भीक मागणारे ते शहरातील पहिले भिकारी आहेत.