हायअलर्ट! दिल्लीतील २९ महत्त्वपूर्व ठिकाणांवर हल्ल्याची शक्यता

दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

Updated: Mar 1, 2019, 01:33 PM IST
हायअलर्ट! दिल्लीतील २९ महत्त्वपूर्व ठिकाणांवर हल्ल्याची शक्यता title=

नवी दिल्ली : सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीतील 29 महत्वपूर्ण ठिकाणांवर हल्ल्याचा अलर्ट दिला आहे. दिल्लीमध्ये दहशतवादी इंडिया गेट, सेना भवन, प्रेसीडेंट हॉउस, संसद भवन, सुप्रीम कोर्ट, सरोजनी नगर बाजार, चांदनी चौक, पालिका बाजार, लक्ष्मी नारायण मंदिर, लोटस टेंपल, लाल किल्ला, नॅशनल डिफेंस कॉलेज, चीफ जस्टिस हाउस, दिल्ली एअरपोर्ट पार्किंग एरिया, दिल्ली रेल्वे स्टेशन, दिल्ली विश्वविद्यालय, एम्स, मॉल्स सिनेमा हॉल, डिफेंस कालेज आणि अक्षरधाम मंदिरावर हल्ला करु शकतात. देशात याआधीच हायअलर्ट आहे. सगळ्याच ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

देशात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीसह महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आता जम्मू-काश्मीर शिवाय भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करु शकतात.

दरम्यान आज कुपवाडामध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार आता थांबला आहे. आर्मी आणि सीआरपीएफ यांची ही संयुक्त कारवाई होती. गोळीबार थांबल्यामुळे आता गावात शोधमोहिमेला सुरूवात झाली आहे.

सीमा सुरक्षा दलाने एका संशयिताला अटक केली आहे. पंजाबच्या फिरोजपूरजवळील भारतीय आऊटपोस्टजवळ ही कारवाई करण्यात आली. संशयिताकडून एक सीम कार्ड हस्तगत करण्यात आलं आहे. हा नंबर तीन पाकिस्तानी व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये सहभागी असल्याचं स्पष्ट झालं आहे. याव्यतिरिक्त तीन मोबाईल फोनदेखील हस्तगत करण्यात आले आहेत. ही संशयित व्यक्ती उत्तर प्रदेशच्या मुरादाबादची असल्याची माहिती मिळते आहे.

नियंत्रणरेषेजवळच्या उरी भागात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक रहिवासी जखमी झाला. बारामुला जिल्ह्यातल्या कमालकोट भागातील गावांच्या परिसरात पाकिस्तानी सैन्यानं गुरुवारी संध्याकाळी अचानक गोळीबार करायला सुरुवात केली. भारताकडून लगेचच त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. रात्रभर हा गोळीबार सुरू होता.