Holi 2023: होळीसाठी दुकानदाराची अजब ऑफर! एका मोबाईलच्या खरेदीवर... पोलिसांनी दुकानच केलं सील

Holi 2023: सणानिमित्ताने वस्तूंवर आकर्षक ऑफर ठेवल्या जातात. पण एका दुकानदाराने होळीसाठी (Holi) मोबाईल (Mobile) खरेदीवर ठेवलेल्या ऑफरने एकच गर्दी झाली. अखेर पोलिसांनी दुकानच सील करुन टाकलं.

Updated: Mar 7, 2023, 06:57 PM IST
Holi 2023: होळीसाठी दुकानदाराची अजब ऑफर! एका मोबाईलच्या खरेदीवर... पोलिसांनी दुकानच केलं सील title=

Holi 2023: संपूर्ण देशभरात होळी (Holi) आणि रंगपंचमीचा (Ranga Panchami) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. होळीचं निमित्त साधत एका दुकानदाराने अजब ऑफर ठेवली. या ऑफरची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. पण ऑफर ठेवणं दुकानदाराला चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी दुकान सील केलं असून दुकानदाराला अटक केली आहे. मोबाईल (Mobile) विक्रीसाठी या दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली. बघता बघता या ऑफरची चर्चा जिल्ह्याभरात झाली आणि मोबाईल खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर लोकांची गर्दी झाली. शेवटी गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

काय होती नेमकी ऑफर?
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) भदोही जिल्ह्यात एका मोबाईल दुकानदाराने होळी सणाच्या निमित्ताने मोबाईल खरेदीवर ऑफर ठेवली होती. एक मोबाईल घेतल्यास दोन बिअर (Beer) मोफत देण्याची ही ऑफर (Offer) होती. त्या दुकानदाराने संपूर्ण जिल्ह्यात याची जाहीरात केली होती. जाहीरातीची पत्रकं वाटली, इतकंच नाहीत तर सोशल मीडियावर (Social Media) त्याने ऑफरची जाहीरात टाकली. बघता बघता या ऑफरची जाहीरात जिल्हाभर पसरली. दुकानदाराला अपेक्षीत नव्हती इतकी गर्दी दुकानाबाहेर जमली. एका मोबाईलच्या खरेदीवर दोन बिअरचे कॅन मिळत असल्याने लोकांची गर्दी होत होती. 3 मार्च ते 7 मार्चपर्यंत ही ऑफर ठेवण्यात आली होती. 

दुकानाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली आणि सर्वात आधी दुकान बंद केलं. त्यानंतर अशी ऑफर ठेवणाऱ्या दुकानदारालाही अटक करण्यात आली. दुकानदाराचं नाव राजेश मौर्य असं असून तो भदोही जिल्ह्यातील रेवडा भागात राहातो. त्याचं आरके मोबाईल सेंटर नावाचं दुकान आहे. होळी निमित्ताने अनेक दुकानदारांनी वेगवेगळ्या ऑफर्स ठेवल्या होत्या. त्यामुळे काहीतरी हटके ऑफर ठेवावी असा विचार राजेश मौर्यने केला. 

बऱ्याच विचारानंतर राजेश मौर्यने एका मोबाईलच्या खरेदीवर 2 बिअर मोफत देण्याची ऑफर ठेवली. पण ही ऑफर त्याला चांगलीच महागात पडली. 

हे ही वाचा : लावा डोकं! सांगा माझी अचूक उंची किती आहे? फोटो शेअर करत मुलीने दिलं नेटकऱ्यांना चॅलेंज

पोलिसांनी दुकान केलं सील
ऑफरची जाहीरातही राजेश मौर्यने दणक्यात केली होती. याचा परिणामही झाला, जिल्हाभरात या जाहीरातीची चर्चा झाली. लोकांनी बिअरच्या अपेक्षेने मोबाईल खरेदीसाठी तुफान गर्दी केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत गर्दी पांगवली. याप्रकरणी दुकानदारावर सार्वजनिक शांतात भंग करण्याच्या कलमाखाली राजेश मौर्यवर गुन्हा दाखल केला. होळीच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आहे.