बांगलादेशात हिंसाचार उफाळल्यानंतर (Bangladesh Violence) आणि आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी कूच करु लागल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी तात्काळ देश सोडला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेलं विद्यार्थी आंदोलन प्रचंड चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि लष्कराच्या विमानाने देशाबाहेर निघून गेल्या. यानंतर शेख हसीना यांनी भारताकडे प्रवास सुरु केला होता. यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणाही (Indian security agencies) कोणत्याही आकस्मिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज होत्या.
भारतीय वायुसेनेचे रडार बांगलादेशावरील हवाई क्षेत्राचं सक्रियपणे निरीक्षण करत होते. ANI च्या वृत्तानुसार, दुपारी 3 च्या सुमारास एक कमी उंचीवर उडणारं विमान भारताच्या दिशेने येत असल्याचं आढळले, सूत्रांनी एएनआयला सांगितलं की. विमानात कोण आहे याची कल्पना हवाई संरक्षण कर्मचाऱ्यांना असल्याने त्यांनी विमानाला भारतात येण्याची परवानगी दिली होती.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, विमानाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी पश्चिम बंगालच्या हाशिमारा हवाई तळावरून 101 स्क्वॉड्रनमधील दोन राफेल लढाऊ विमाने बिहार आणि झारखंडवर उड्डाण करण्यात आली. हे विमान त्याच्या उड्डाणाच्या मार्गावर होते आणि दुसरीकडे जमिनीवर असणाऱ्या यंत्रणा याचं बारकाईने निरीक्षण करत होत्या. त्यांच्यात आणि उच्च भारतीय सुरक्षा अधिकारी यांच्यात सतत संवाद सुरु होता असं सूत्रांनी सांगितलं आहे.
सूत्रांनी सांगितले की, भारतीय हवाई दल आणि लष्कर प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि जनरल उपेंद्र द्विवेदी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख जनरल द्विवेदी आणि इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जॉन्सन फिलिप मॅथ्यू यांच्या सहभागासह उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठकही झाली.
संध्याकाळी 5.45 च्या सुमारास हसीना यांचं विमान जेट हिंडन हवाई तळावर उतरलं असता, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्यात तासभर बैठक पार पडली. यादरम्यान बांगलादेशातील सद्यस्थिती आणि भविष्यातील घडामोडी यावरही चर्चा झाली.
यानंतर अजित डोवाल यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीला माहिती दिली. दुसरीकडे पंतप्रधानांना दिवसभरातील घडामोडींची सतत माहिती दिली जात होती.