आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोजावी लागणारी किंमतही मोठी असते. यामुळेच अनेकांना बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. गृहकर्जामुळे आपलं स्वप्न तर पूर्ण होतं, पण आपण कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवरील व्याजही फेडत असतो. कर्जाची रक्कम जास्त असल्याने अनेकजण वर्षंही जास्त ठेवतात.
गेल्या काही वर्षांपासून जसजशी महागाई वाढत आहे, व्याजदरही वाढत आहे. व्याजदर वाढल्याने आपल्या कर्जाचा हफ्ता वाढतो किंवा कार्यकाळ वाढतो. जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाखांचं कर्ज घेता तेव्हा तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंटइतकंच व्याजही द्यावं लागतं. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी दुप्पट पैसे मोजता. पण जर तुम्ही ठरवलंत तर SIP च्या आधारे कर्जाची ही संपूर्ण रक्कम वसूल करु शकता. त्यासाठी काय करावं लागेल हे समजून घ्या..
आता समजा की, तुम्ही एसबीआय बँकेतून 20 वर्षांसाठी 30 लाखांचं कर्ज घेतलं आहे. तर मग 9.55 टक्के व्याजदरासह तुम्हाला एकूण 67 लाख 34 हजार 871 रुपये बँकेला द्यावे लागतात. म्हणजेच तुमची प्रिंसिपल अमाऊंट 30 लाख आणि व्याज 37 लाख 34 हजार 871 असेल. तसंच तुमचा मासिक हफ्ता 28 हजार 062 रुपये असेल, तोही जर संपूर्ण 30 वर्षं व्याजदर 9.55 टक्के राहिला तरच.
यावरुनच तुम्हाला गृहकर्जासाठी आपल्याला किती मोठी किंमत मोजावी लागते हे समजत असेल. पण मग ही अतिरिक्त रक्कम आपण वसूल कशी करायची असा विचार तुमच्याही मनात येत असतील. तर मग समजून घ्या...
जर तुम्हाला कर्ज आणि व्याजाची सगळी रक्कम वसूल करायची असल तर म्युच्युअल फंड SIP एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या गृहकर्जाचे हफ्ते सुरु होताच तुम्ही तितक्याच काळासाठी एक मासिक एसआयपी सुरु करा. तुम्ही कितीची एसआयपी सुरु करायची हे तुमच्या होम लोनच्या मासिक हफ्त्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही तुमच्या EMI च्या 20-25 टक्के SIP करत असाल, तर गृहकर्जाच्या शेवटी तुम्ही बँकेला जेवढे पैसे द्याल तेवढे पैसे तुम्ही मिळवाल. कसं ते समजून घ्या...
एकूण गृहकर्ज: 30 लाख रुपये
कार्यकाळ: 20 वर्षं
व्याज दर: वार्षिक 9.55 टक्के
ईएमआय: 28,062 रुपये
कर्जावरील एकूण व्याजः 37,34,871 रुपये
कर्जापोटी एकूण पेमेंट: 67,34,871 रुपये
SIP रक्कम: EMI च्या 25% (7,015 रुपये)
गुंतवणूक कालावधी: 20 वर्षं
अंदाजे परतावा: 12% प्रतिवर्ष
20 वर्षानंतर एसआयपी मूल्य: 70 लाख 9 हजार 23 रुपया