एफ-१६ विमानांना धूळ चाळणाऱ्या अभिनंदन यांच्या स्क्वॉर्डनच्या गणवेशावर लागणार 'हे' खास बॅच

एफ-१६ विमानांमधील एमराम क्षेपणास्त्र शत्रूचा नेहमी अचूक वेध घेते.

Updated: May 15, 2019, 05:06 PM IST
एफ-१६ विमानांना धूळ चाळणाऱ्या अभिनंदन यांच्या स्क्वॉर्डनच्या गणवेशावर लागणार 'हे' खास बॅच title=

नवी दिल्ली: बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेला प्रतिहल्ला परतवून लावताना शौर्य गाजवणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या मिग २१ बायसन स्क्वॉर्डनचा भारतीय वायूदलाकडून गौरव करण्यात येणार आहे. या हल्ल्याच्यावेळी अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या मिग-२१ विमानाच्या सहाय्याने पाकिस्तानचे अद्यायावत तंत्रज्ञान असलेले एफ-१६ विमान पाडले होते. मिग २१ बायसन विमानांच्या जोरदार प्रतिहल्ल्याने गांगरलेल्या पाकिस्तानी विमानांनी लगेचच पळ काढला होता. यामध्ये अभिनंदन वर्धमान यांच्या ५१ व्या स्क्वॉर्डने मोलाची भूमिका बजावली होती. एफ-१६ या विमानाला फाल्कन या नावानेही ओळखले जाते. तर स्लेयर्सचा अर्थ वध करणारा असा होतो. त्यामुळे अभिनंदन यांची स्क्वॉर्ड्रन यापुढे 'फाल्कन स्लेयर्स' या नावाने ओळखली जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, यापुढे या स्क्वॉर्डनमधील जवानांच्या गणवेशावर 'फाल्कन स्लेयर्स'  आणि 'एमराम डोजर्स' हे दोन बिल्ले लावले जातील. वायूसेनेकडून हे बॅच तयार करण्यासाठी ऑर्डर देण्यात आल्याचेही समजते. यापैकी 'एमराम डोजर्स'चा संबंधही एफ-१६ विमानांशी आहे. या विमानांमध्ये एमराम ही अद्यायावत क्षेपणास्त्रे असतात. हल्ल्याच्यावेळी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानातून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. मात्र, भारताच्या मिग २१ बायसन आणि सुखोई विमानांनी या क्षेपणास्त्राला यशस्वीपणे गुंगारा (डॉज) दिला होता. अद्यायावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली एमराम क्षेपणास्त्रे आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी ओळखली जातात. मात्र, भारतीय वैमानिकांच्या कामगिरीमुळे हे क्षेपणास्त्र वाया गेले होते. त्यामुळे ५१ व्या स्क्वॉर्डनमधील जवानांच्या गणवेशावर 'एमराम डोजर्स' हा बिल्लादेखील लावला जाईल. 

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी अतुलनीय शौर्य दाखवत मिग-२१ बायसन या तुलनेने जुन्या विमानाच्या साहाय्याने अद्यायावत समजल्या जाणाऱ्या अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ विमानाला धूळ चारली होती. या नादात अभिनंदन यांचे मिग-२१ विमानही पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन कोसळले होते. मात्र, मिग-२१ विमानाकडून एफ-१६ चा पराभव होणे, ही बाब पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागली होती.