Corona : भारतातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोना

देशातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोनाची लागण झाली आहे.

Updated: Apr 15, 2020, 06:59 PM IST
Corona : भारतातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोना title=

नवी दिल्ली : देशातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोनाची लागण झाली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतातल्या वटवाघळांमध्ये कोरोना आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. आयसीएमआर आणि एनआयव्हीने केलेल्या तपासणीनुसार इंडियन फ्लायिंग फॉक्स आणि राऊसेटस (फ्रुट बॅट्स) या प्रजातींमध्ये कोरोना आढळला आहे.

केरळ, तामीळनाडू, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी या राज्यांमधून २५ प्रकारच्या वटवाघळांची सॅम्पल्स घेण्यात आली होती. या वटवाघळांमधून माणसांना कोरोना होत नसल्याचं आयसीएमआरच्या डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. हजार वर्षातून एकदाच कोरोना व्हायरस वटवाघळामधून माणसाला होण्याची शक्यता असल्याचं गंगाखेडकर म्हणाले.

सुरुवातीला वटवाघळांना कोरोना व्हायरस झाला. वटवाघळांमधून कोरोनाचा संसर्ग खवल्या मांजरांना झाला आणि खवल्या मांजरांमुळे माणसांना कोरोनाची लागण झाली, असं संशोधन चीनमध्ये झालं असल्याचं गंगाखेडकर यांनी सांगितलं. 

अभ्यास करण्यासाठी ५०८ इंडियन फ्लायिंग फॉक्स आणि ७८ राऊसेटस बॅट्स यांचे सॅम्पल घेण्यात आले. यातले २१ इंडियन फ्लायिंग फॉक्स आणि ४ राऊसेटस बॅट्स यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. २०१८ आणि २०१९ साली केरळ, कर्नाटक, तामीळनाडू, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, ओडिसा, तेलंगणा, चंदीगड आणि पुदुच्चेरी या ठिकाणांवरुन वटवाघळांची चाचणी करण्यासाठीचे नमुने घेण्यात आले होते.

कोरोना झालेली सगळी राऊसेटस आणि १२ इंडियन फ्लायिंग फॉक्स केरळमधली आहेत. तर पुदुच्चेरीमधली ६, हिमाचल प्रदेशमधली २ आणि तामीळनाडूमधल्या एका इंडियन फ्लायिंग फॉक्सला कोरोना झाला आहे.