...तर सिद्धू यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसचे नेते आक्रमक

त्यामुळे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग नाराज झाले होते. 

Updated: Dec 2, 2018, 05:38 PM IST
...तर सिद्धू यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसचे नेते आक्रमक title=

नवी दिल्ली: पाकिस्तानविषीय घेतलेल्या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरोधात स्वपक्षीय चांगलेच आक्रमक झाले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांचे नेतृत्व मान्य नसेल तर त्यांना राजीनामा द्यावा, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली आहे. 

इम्रान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानात जाऊन वाद ओढवून घेतलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी नुकताच कर्तारपूर कॉरिडॉरच्या भूमीपूजनासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग नाराज झाले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने आपल्या पाकिस्तान दौऱ्याला हिरवा कंदील दाखवल्याचे सांगत सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले होते. 

अमरिंदर सिंग यांच्या नाराजीबाबत सिद्धू यांना विचारले असता त्यांनी राहुल गांधी हे अमरिंदर सिंग यांचेही कॅप्टन आहेत, असे वक्तव्य करून आगीत आणखीनच तेल ओतले. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांच्या समर्थकांना सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सिद्धू हे अमरिंदर यांना कॅप्टन समजत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारीनुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा, असा पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतला. यानंतर सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांना सारवासरव करावी लागली.