नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या कालच्या भेटीबद्दल उठणाऱ्या अनेक प्रश्नांवर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रत्यूत्तर दिलंय.
संजय राऊत यांनी बुधवारी न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफ यांची भेट घेऊ शकतात, तर आम्ही ममता बॅनर्जी यांची भेट का घेऊ शकत नाहीत? त्या एक भारतीय आहेत आणि एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत' अशा शब्दांत उत्तर दिलंय.
एकेकाळी ममताही एनडीएचा एक भाग होत्या. आज त्या एनडीएमध्ये नाहीत म्हणून काय झालं... म्हणून त्या अस्पृश्य झाल्या का? असा सवालही संजय राऊत यांनी पत्रकारांना विचारला.
उल्लेखनीय म्हणजे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पार्टीच्या प्रमुख ममता बॅनर्जी सध्या दिल्लीत आहेत. तसंच त्या सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीघेटी घेण्यात व्यस्त आहेत. भाजपविरोधी आणि गैर-काँग्रेस युती तयार करण्याच्या तयारी करत आहेत.
ममता बॅनर्जी यांनी आत्तापर्यंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच तेलगू देसम पार्टी, सपा, राजद, बीज यांच्यासोबतच शिवसेना नेत्यांचीही भेट घेतलीय.