मुंबई : रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC वेबसाइट किंवा ऍप खूप उपयुक्त आहे. यावर तुम्ही कोणत्याही एजन्टच्या मदतीशिवाय किंवा जास्त पैसे न मोजता घरबसल्या तुमचं तिकीट बुक करु शकता. मात्र, अनेकांना तत्काळ तिकीट आरक्षित करताना खूप त्रास होतो. तत्काळ तिकिटांची मुदत कमी वेळातच संपते ज्यामुळे कन्फर्म सीट उपलब्ध होत नाही. ज्यामुळे अनेकांचे नुकसान होते. पण आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तत्काळ तिकीट लवकर बुक करू शकता आणि तुम्हाला कन्फर्म सीट देखील मिळेल. यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण पद्धत सांगत आहोत.
पहिले तर IRCTC वरून तिकीट बुक करण्यासाठी, तुमचे त्यावर खाते असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे आधीपासूनच खाते असल्यास, तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी पुढे जाऊ शकता.
तत्काळ तिकिटे लवकर बुक करण्यासाठी, तुम्ही IRCTC वेबसाइटऐवजी त्याचे ऍप वापरावे. तुम्ही ते Google Play Store किंवा App Store वरून डाउनलोड करू शकता.
IRCTC मोबाइल ऍप डाउनलोड केल्यानंतर, त्यावर लॉग इन करा. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ऍपच्या तळाशी My Account चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला माय मास्टर लिस्टचा पर्याय निवडावा लागेल.
यामध्ये, वरच्या डाव्या बाजूला Add Passenger या पर्यायावर क्लिक करा, ज्या प्रवाशांसाठी तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे त्यांची नावे जोडा.
तत्काळ तिकीट बुकिंग एसी कोचसाठी सकाळी 10 वाजल्यापासून आणि नॉन-एसी साठी 11 वाजल्यापासून सुरू होते.
त्यामुळे जर तुम्हाला एसी कोचचं बुकिंग करायचं असेल तर 10 वाजण्याच्या आधी म्हणजे 9.58 किंवा 9.57 वाजता तुम्ही ऍपवर लॉग इन करा. यानंतर तुम्ही स्टेशन, तारीख आणि ट्रेन निवडा.
तोपर्यंत 10 वाजतील आणि बुकिंचा वेळ सुरू होताच तिकीट बुक करणे सुरू करा. जिथे तुम्हाला पॅसेंजर डिटेल्स टाकायचे आहेत, तिथे Add Existing या पर्यायावर क्लिक करून तुम्ही माय मास्टर लिस्टमध्ये जोडलेला प्रवासी जोडू शकता. म्हणजे तुमचं काम लवकर होईल, ज्यामुळे तुम्ही अगदी पुढच्याच 2 मिनिटात कन्फर्म तिकीट मिळवू शकता.