डेहराडूनमध्ये रंगला IMA चा दीक्षांत सोहळा, महाराष्ट्राच्या विनयनं पटकावलं गोल्ड मेडल

महाराष्ट्राच्या विनय विलास गर्द याला 'स्वार्ड ऑफ ऑनर'सोबतच गोल्ड मेडलनंही गौरविण्यात आलंय

Updated: Dec 7, 2019, 04:12 PM IST
डेहराडूनमध्ये रंगला IMA चा दीक्षांत सोहळा, महाराष्ट्राच्या विनयनं पटकावलं गोल्ड मेडल

डेहराडून : डेहराडूनमधल्या इंडियन मिलिट्री ऍकॅडमीमध्ये (IMA) दीक्षांत समारोह पार पडला. बोचऱ्या थंडीत शानदार सोहळ्यात कॅडेट्सचा हाल दीक्षांत सोहळा रंगला. यंदाच्या तुकडीमध्ये एकंदर ३७७ कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं. उल्लेखनीय म्हणजे, यापैंकी ३०६ कॅडेट्स हे भारतीय आहेत तर उर्वरित ७१ कॅडेट्स हे इतर देशांतले प्रशिक्षणार्थी आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती होती. सर्व कॅडेट्सनी त्यांना सलामी दिली. त्यानंतर शिस्तबद्ध कवायतींनी सर्व उपस्थितांची मनं जिंकली. देशाच्या सेवेसाठी हे अधिकारी आता सज्ज झाले आहेत.

भारतीय सैन्य अकादमीच्या यंदाच्या पासिंग आऊट परेडमध्ये महाराष्ट्राच्या विनय विलास गर्द याला 'स्वार्ड ऑफ ऑनर'सोबतच गोल्ड मेडलनंही गौरविण्यात आलंय. 

विनयचे आई-वडील शिक्षक आहेत. विनय हा त्याच्या कुटुंबातील सैन्यात दाखल होणारा पहिलाच व्यक्ती आहे. विनयला आपल्या कामगिरीचा आनंद असला तरी त्याच्या कुटुंबासाठी मात्र आपल्या मुलावर गर्व आहे. 

सैनिक शाळेत प्रशिक्षण घेत असल्यापासूनच विनयला या क्षेत्राची ओढ लागली होती. आपल्याला 'गोल्ड मेडल' किंवा 'स्वार्ड ऑफ ऑनर' मिळवायचाय असा त्यानं कधीही विचार केलेला नव्हता... पण, आजच्यापेक्षा उद्याची माझी कामगिरी चांगली असेल, असा निर्धार कायम ठेवल्याचं यावेळी विनयनं म्हटलंय.