कडक सॅल्यूट! ना धामधूम, ना बडेजाव, सिटी मजिस्ट्रेट आणि मेजर जोडीने अवघ्या 500 रुपयातं उरकलं लग्न

अनेक जण मोठ्या थाटामाटात तसेच वारेमाप खर्च करुन लग्न करतात. 

Updated: Jul 15, 2021, 10:30 PM IST
कडक सॅल्यूट! ना धामधूम, ना बडेजाव, सिटी मजिस्ट्रेट आणि मेजर जोडीने अवघ्या 500 रुपयातं उरकलं लग्न  title=

भोपाळ : आपल्याकडे मोठ्या थाटामाटात तसेच वारेमाप खर्च करुन लग्न केलं जातं. काही जण तर अगदी कर्ज काढून लग्न करतात. त्यात नवरा किंवा नवरी सरकारी कर्मचारी असतील तर लग्नात वऱ्हाडी मंडळीची चांगलीच चंगळ असते. सरकारी नोकरी असलेले कर्मचारी आपल्या लग्नात मोठ्या प्रमाणात वारेमाप पैसा खर्च करतात. पण एका नवविवाहीत जोडप्याने या प्रकाराला फाटा दिलाय. या जोड्याने कोणताही बडेजाव न मिरवता अवघ्या 500 रुपयांमध्ये लग्न उरकलं आहे. मेजर आणि सिटी मजीस्ट्रेटने लगीनगाठ बांधली. तसेच समाजासमोर चांगला आदर्शही ठेवला आहे. (In Madhya Pradesh, city magistrate and major got married for just Rs 500)
   
मध्य प्रदेशमधील धार येथे सिटी मजिस्ट्रेट शिवांगी जोशी आणि आर्मी मेजर अनिकेत चतुर्वेदी यांचा हा विवाह सोहळा संपन्न झाला. केवळ हार आणि गोड म्हणून मिठाई अशा दोन गोष्टींसाठी 500 रुपयांचा खर्च आला.  

कोणताही थाट माट  न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीनेही लग्न करता येतं, हेच या जोडीने आपल्या कृतीतून समाजाला दाखवून दिलंय. लग्न पार पडल्यानंतर या दोघांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली. या दोघांनी आपल्या विवाहाची नोंदणीही केली. 

कोरोनामुळे लग्नाला उशीर 

कोरोनामुळे लग्न दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आले होते. यानंतर या दोघांनीही कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने लग्नाद्वारे सामाजिक संदेश    देण्याचा निर्णय घेतला. शिवांगी जोशी म्हणाल्या की, "कोरोना गेली दोन वर्षे सुरू आहे, अशा वेळी कोरोना योद्धा म्हणून काम करणं ही माझी प्राथमिकता आहे. त्यामुळे लग्नात थाटमाट न करता आपण समाजासाठी उपलब्ध असणं म्हत्वाचं आहे".  
 
वारेमाप खर्चाचा विरोध

सिटी मजिस्ट्रेट शिवांगी जोशी म्हणाल्या की, "कोरोना कमी झाला आहे, पण तो पूर्ण पणे नियंत्रणात आलेला नाही. लोकांनीही नियमांचं पालन करावं अन् लग्नावर नाहक खर्च करु नये, यामुळे आम्ही अशाप्रकारे साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. मी विनाकारण खर्च करणं मला पटत नाही. लग्नात वारेमाप खर्चामुळे मुलीच्या कुटुंबावरचा आर्थिक बोजा वाढतो. तसेच पैसा नको त्या गोष्टींवर खर्च होतो". विशेष म्हणजे या विवाहप्रसंगी नातेवाईकांसह जिल्हाधिकारी आणि इतर महत्वाचे अधिकारीही उपस्थित होते.