सौदी अरेबियातील हॉटेलमध्ये महिला-पुरुषांसाठी आता एकच प्रवेशद्वार

यापूर्वी हॉटेलमध्ये जाताना कुटुंब आणि महिलांसाठी एक प्रवेशद्वार असणं अनिर्वाय होतं.

Updated: Dec 9, 2019, 11:57 AM IST
सौदी अरेबियातील हॉटेलमध्ये महिला-पुरुषांसाठी आता एकच प्रवेशद्वार
संग्रहित फोटो

रियाध : सौदी अरेबियामध्ये पुरुष आणि महिलांमध्ये होणारा भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी कायद्यांमध्ये काही बदल केले जात आहेत. सौदी अरेबियामध्ये हॉटेलमध्ये प्रवेश करताना पुरुष आणि महिलांसाठी असलेले वेगवेगळे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. यापूर्वी हॉटेलमध्ये जाताना कुटुंब आणि महिलांसाठी एक प्रवेशद्वार असणं अनिर्वाय होतं. तर पुरुषांसाठी दुसरं प्रवेशद्वार होतं. मात्र रविवारी घेण्यात आलेल्या निर्णयानंतर आता, हॉटेलमध्ये प्रवेश करताना लिंगानुसार असलेल्या वेगवेगळ्या प्रवेशांवर बंदी घालण्यात आली आहे.

सौदी अरेबियावरील निर्बंध कमी करण्यासाठी अलीकडच्या काही महिन्यांमध्ये प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून काही निर्णय घेतले जात आहेत. सौदी मंत्रालयाकडून रविवारी ट्विटरवरुन, सौदी अरेबियातील हॉटेलमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगळं प्रवेशद्वार असणे अनिर्वाय नसल्याचं सांगण्यात आलं.

काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियातील महिलांना स्वतंत्रपणे प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली. २०१८ मध्ये सौदीतील महिला कार चालकांवरील बंदी उठवण्यात आली होती.