मुंबई : ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने दिला आणि देशभर चर्चा सुरू झाली. पण, असा निर्णय घेणारा भारत हा काही एकटाच देश नाही. भारताने निर्णय घेण्याआधीही सुमारे २२ देशांनी ट्रिपल तलाकवर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे या २२ देशांमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, सीरिया यांसारखे मुलतत्ववादी देशही आहेत.
इजिप्त हा जगातील पहिला देश आहे ज्याने ट्रिपल तलाकवर पहिल्यांदा बंदी घातली. या देशात १९२९मध्ये मुस्लिम न्यायाधिशांनी सर्वानुमते ट्रिपल तलाकवर बंदी घातली होती. इजिप्तच्या पावलावर पाऊल टाकत सुदाननेही देशातून १९२९मध्ये ट्रिपल तलाकची हकालपट्टी केली. दरम्यान, १९४७ला फाळणी झाल्यावर भारताचा शेजारी पाकिस्ताननेही ट्रिपल तलाकवर बंदी घातली. बांग्लादेशही या यादीत आला. यासोबतच भारताचा आणखी एक शेजारी श्रीलंकामध्येही ट्रिपल तलाकवर बंदी आहे.
१९५९मध्ये इराकने ट्रिपल तलाकवर बंदी घातली. इराक हा अरबी देशातील ट्रिपल तलाकवर बंदी घालणारा पहिला देश होता. इराक पाठोपाठ सीरियानेही ट्रिपल तलाकवर बंदी घातली. विशेष म्हणजे सीरियात ७५ टक्के मुस्लिम आहेत. यासोबतच सायप्रस, जॉर्डन, अल्जेरिया, इराण, ब्रुनेई, मोरक्को, कतार तसेच यूएई मध्येही ट्रिपल तलाकवर बंदी आहे.