प्रत्येक गल्लीत उघडणार 'हे' दुकान, पीएम मोदींनी केली घोषणा... तुम्हालाही आहे कमाईची संधी

PM Jan Aushadhi Kendra : देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. सर्वांना स्वस्त दरात जेनरिक औषधं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. जन औषधी केंद्रांची संख्या वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 15, 2023, 07:55 PM IST
प्रत्येक गल्लीत उघडणार 'हे' दुकान, पीएम मोदींनी केली घोषणा... तुम्हालाही आहे कमाईची संधी title=

PM Jan Aushadhi Kendra : देशाच्या 77 व्या स्वांतत्र्यदिनानिमित्ताने लाल किल्ल्यावर जनेतला संबोधित करताना पीएम मोदी यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात पीएम मोदी यांनी जन औषधी केंद्राबद्दलही माहिती दिली. जन औषधी केंद्रांची संख्या 10 हजाराहून वाढवून 25 हजारावर नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेनरिक औषधांचा साठा वाढवण्याचा उद्देश पूर्ण करण्याबरोबरच लोकांना कमाईची संधी कशी उपलब्ध होईल याकडेही आता लक्ष देण्यात येणार आहे. 

नऊ वर्षात 9,884 केंद्र
देशातील नागरिकांना स्वस्त दरात उपचार करण्यासाठी जेनरिक औषधांचा मोठा उपयोग होत आहे. जेनरिक औषधांकडे लोकंचा कलही वाढलेला दिसून येत आहे. मार्च 2024 पर्यंत देशभरात 10 हजार Jan Aushadhi Kendra उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. विशेष म्हणजे डेडलाईनआधीच हे लक्ष्य पूर्ण झालं होतं. 2014 पर्यंत देशात केवळ 80 जन औषधी केंद्र होती. पण मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या 9 वर्षात जन औषधी केद्रांची सख्या  9,884 इतकी झाली आहे. 

मधूमेह असलेल्या रुग्णांना महिन्याला कमीतकमी 3 हजार रुपये महिना खर्च करावा लागतो. मधूमेह आजारात घ्यावी लागणारी औषधं ही किमान 100 रुपयांची असतात. पण जन औषधी केंद्रांवर हीच औषधं 10 ते 15 रुपयात उपलब्ध होतात असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. देशातील सर्व लोकांना याचा लाभ व्हावा यासाठी जन औषधी केंद्रांची संख्या 10 हजाराहून 25 हजार करण्याची सरकारची योजना आहे. 

प्रत्येक गल्लीत जन औषधी केंद्र
पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर देशातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गल्लीत जन औषधी केंद्र उघडण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. जन औषधी केंद्र हे एका छोट्या मेडिकल स्टोअर्ससारखंच असतं. जन औषधी केंद्र उघडण्यासाठी काही अटीशर्थी पूर्ण कराव्या लागतात. त्यानंतर तुम्ही सुद्धा हे केंद्र उघडून चांगली कमाई करु शकता.

कोण उघडून शकतं जन औषधी केंद्र
Jan Aushadhi Kendra उघडण्यासाठी काय पात्रता असावी लागते, असा प्रश्न उपस्थित होतो. देशातील कोणताही व्यक्ती, फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जन औषधी केंद्र उघडू शकतात. दुसऱ्या कॅटेगेरीत ट्रस्ट, एनजीओ, प्राइव्हेट हॉस्पीटल येतात. तर तिसऱ्या कॅटेगरीत राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या संस्था जन औषधी केंद्र उघडू शकतात. पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या योजनेअंतर्गत एसी-एसटी आणि दिव्यांग अर्जधारकांना 50 हजार रुपयांपर्यंतची औषध आगाऊ दिली जाण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे केंद्र पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या नावाने सुरु केलं जातं. 

Jan Aushadhi Kendra सुरु करण्यासाठी रिटेल ड्रग्स सेल्सचं लायसन्स घेणं आवश्यक आहे. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर (janaushadhi.gov.in) यासाठी तुम्ही अर्ज करु शकता. जन औषधी केंद्र योजनेअंतर्गत केंद्र सुरु करण्यासाठी फर्नीचर आणि इतर आवश्यक सामानासाठी दीड लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते. बिलिंगसाठी कॉम्प्यूटर आणि प्रिंटर घेण्यासाठीही आर्थिक मदत केली जाते. Jan Aushadhi Kendra केंद्र सुरु करण्यासाठी पाच हजार रुपये अर्ज शुक्ल भरावं लागतं. अर्ज करण्याऱ्याकडे डी. फार्मा किंवा बी. फार्माचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. याशिवाय आधार कार्ड, फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पॅन कार्ड, निवासप्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्र असणं गरजेचं आहे.