INDIA Meet Live: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून इंडिया आघाडीची (INDIA) बैठक सुरु आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील दिग्गज नेते मुंबईत दाखल होत आहेत. या बैठकीला देशभरातील 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी हजर आहेत. यामध्ये 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. यावेळी कोणत्या नेत्याने काय भाषण केले हे थोडक्यात जाणून घेऊया.
उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
आपलं 'इंडिया' जोरदार सुरु असून 'इंडिया'च्या विरोधकांमध्ये अस्वस्थता आहे. आपण मित्र परिवारवादाच्या विरोधात ही लढाई लढत आहोत. आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढणार आहोत. आम्ही जुमलेबाजांविरोधात लढणार आहोत. आम्ही मित्रपरिवारवादा विरोधातही लढणार आहोत. 'सबका साथ सबका विकास' हा नारा मी ऐकला होता. निवडणुकीनंतर सर्वांना लाथ आणि मित्र परिवाराचा विकास झाला. पण आता घाबरू नका. भयमुक्त भारतासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे म्हणाले.
मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेस
पंतप्रधान मोदी 100 रुपये वाढवतात आणि 2 रुपये कमी करतात. पंतप्रधान गरीबांसाठी कधीच काम करत नाही. ते उद्योजक मित्रांसाठी काम करतात. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. इंडियाचा लढा महागाईविरोधात आहे.
नितीश कुमार, बिहार
जे आता केंद्रात आहेत ते हरतील. तेव्हा पत्रकारांना स्वातंत्र्य मिळेल. त्यांना हवं ते लिहिता येईल. त्यावेळी कोणाचीच उपेक्षा होणार नाही. आम्ही देशाचा इतिहास बदलू देणार नाही.
अरविंद केजरीवाल, आम आदमी
मोदी सरकार हे आझाद भारतातील सर्वात भ्रष्ट आणि अहंकारी सरकार आहे. हे सरकार एका माणसासाठी काम करतंय. तो माणून देशातील पैसा बाहेर नेतोय. हे सरकार स्वत:ला देवापेक्षाही मोठं समजतंय. हेच त्यांच्या पतनाचे कारण ठरणार आहे.
लालू प्रसाद यादव, राष्ट्रीय जनता दल, बिहार
देशात गरीबी आणि महागाई वाढत आहे. किती खोटं बोलून हे लोक सत्तेवर आले आहेत हे सर्वांना माहिती आहे. लोकांचे पैसे स्वीस बॅंकेत असल्याचे त्यांनी सांगितले. मोदीजी येऊन ते पैसे बॅंक खात्यात परत देतील असे आश्वासन त्यांनी दिले. आम्ही कुटुंबातील 11 जणांनी खाती उघडली. देशाचे पैसे परत येतील असे वाटले पण तसे झाले नाही. सर्व या लोकांचाच पैसा आहे.
राहुल गांधी, कॉंग्रेस
सेशनमध्ये 2 गोष्टी ठरल्या. कॉर्डिनेशन समिती असेल आणि जागांबद्दल चर्चा होईल. मी नुकताच लडाख दौऱ्यात तिथली परिस्थिती पाहिली. चीन आपल्या भागात आला आहे. मीडिया याबाबत काहीच बोलत नाही. लडाखमध्ये जी परिस्थिती आहे ती लज्जास्पद आहे. नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील जे नातं आहे त्यावर मी काल बोललो. 1 बिलियन डॉलर्स भारतातून बाहेर गेले आणि परत आले. नरेंद्र मोदी G20 भरवत आहेत. मात्र त्यांनी अदानी यांची चौकशी करावी.
शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस
आम्ही चुकीच्या मार्गावर जाणार नाही. जे जात आहेत त्यांना योग्य मार्गावर आणू, शेतकरी, तरुण, मजुरांच्या अनेक समस्या आहेत. ज्या लोकांनी भाजपला देशाची जबाबदारी दिली त्याच लोकांमध्ये नाराजी असल्याचे शरद पवार म्हणाले. देशाची सत्ता हातात आल्यानंतर, जमिनीवर पाय ठेवणारं नेतृत्व खूप लांब गेलं आहे. विरोधकांबद्दल भाजपचे वरिष्ठ नेता घमंडिया असा उल्लेख करुन टीका करतात. अहंकारी कोण आहे, हे यातून दिसत असल्याचे ते म्हणाले.