नवी दिल्ली : लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि विशेष पथक तसेच गुप्तचर विभागाने रविवारी हेरगिरी करताना पकडलेले पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन अधिकारी आणि ड्रायव्हर पाकिस्तानच्या लष्कराशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे.
पाकिस्तानसाठी दुप्तहेर म्हणून काम करत असलेल्या तिघांना अटक झाल्यानंतर त्यांचे कनेक्शन कुठे कुठे आहे याचा शोध घेतला जात आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या गोपनीय प्लाननुसार २०१३ साली ते दिल्लीत व्हिसा विभागात काम करू लागले आणि एक जण पाकिस्तानी उच्चायुक्तांचा ड्रायव्हर बनला.
भारतीय यंत्रणांनी पकडलेले आबिद आणि ताहीर हुसेन हे स्वतः बोगस ओळखपत्र घेऊन भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करायचे. आपली नियुक्ती भारतीय सैन्याच्या सेंट्रल बोर्ड पोस्ट ऑफिसमध्ये असल्याचं सांगून ते भारतीय सैन्यात संबंध जोडण्याचा प्रयत्न करू लागले होते.
आयएसआयकडून षडयंत्र यशस्वी करण्यासाठी दर महिन्याला मोठी रक्कम या तिघांना पोहचवली जात होती. यांच्याकडून आयएसआयला जी माहिती हवी होती त्यात देशातील संवेदनशील सीमेवर असलेली सैन्याची तैनाती आणि भारतीय लष्करातील शस्त्रास्त्रांसंबंधी गुप्त माहिती हवी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दोन अधिकारी भारतीय लष्करातील कनिष्ठ श्रेणीतील जवानांच्या घरापर्यंत पोहचले होते. त्यांना जाळ्यात ओढून आपला डाव साधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. भारतीय असल्याची ओळख सांगत ते भारताविरोधी काम करत होते. भारताने त्यांची कृती अमान्य असल्याचं जाहीर करून त्यांना २४ तासांत देश सोडून जाण्यास सांगितलं आहे.
भारतात राजनैतिक कामासाठी नियुक्त केलेला कोणताही पाकिस्तानी अधिकारी अशा पद्धतीने वागू शकत नाही आणि यापुढे याबाबतीत कठोर पालन करावे लागेल अशी तंबी भारताने पाकिस्तानला दिली आहे. याआधी २०१६ सालीही असाच प्रकार घडला होता. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एक अधिकारी मोहम्मद अख्तर तेव्हा भारतीय यंत्रणांकडून काही संवेदनशील कागदपत्रे मिळवल्याप्रकरणी पकडला गेला होता आणि त्याच्यावरही अशीच कारवाई करण्यात आली होती.
आता पकडले गेलेले दोघेही पाकिस्तानी सैन्याशी संबंधित असून अबिद हुसेन अबिद हा पाकिस्तानातील पंजाबच्या शेखपुरा भागातील रहिवासी आहे, तर मोहम्मद ताहिर हा इस्लामाबादमधील रहिवासी आहे.