हिमाचलपासून गुजरात-महाराष्ट्रापर्यंत पावसाचा तांडव; दिल्लीतही हाय अलर्ट

India Forecast : देशात गेल्या आठडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगडसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 23, 2023, 07:52 AM IST
हिमाचलपासून गुजरात-महाराष्ट्रापर्यंत पावसाचा तांडव; दिल्लीतही हाय अलर्ट title=
(फोटो सौजन्य - PTI)

India Monsoon Rains : मुसळधार पावसानंतर (Rainfall) देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे ढगफुटीने दोन डोंगराळ राज्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. हिमाचल प्रदेशातील (himachal) शिमला आणि कुल्लू जिल्ह्यात ढगफुटीच्या घटनेत तीन जण बेपत्ता झाले आहेत. तर शिमला येथे दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. लडाखमध्येही ढगफुटीमुळे आलेल्या महापुरामुळे मुख्य बाजारपेठ पाण्याने भरली होती. दरम्यान, गुजरातच्या (Gujarat) दक्षिणेकडील भाग आणि सौराष्ट्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने धरणे आणि नद्यांमधील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीवर गेली आहे. जुनागडमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक गाड्या आणि गुरे वाहून गेली आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्रातील (Maharashtra) यवतमाळमध्ये पुरामुळे अडकलेल्या सुमारे 110 जणांची शनिवारी सुटका करण्यात आली आहे. त्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.

पावसामुळे राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वात वाईट स्थिती आहे. मुसळधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पुन्हा एकदा दिल्लीकरांसाठी धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने अहमदाबादसह सौराष्ट्र, दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. येथे अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हिमाचलमध्ये पावसाचा प्रकोप

हिमाचल प्रदेशातील अनेक भागात शुक्रवारी रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. शिमला जिल्ह्यातील कोटखाई येथील बाग दुमैहार पंचायतीमध्ये भूस्खलनात घर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे, ढगफुटीमुळे रात्री उशिरा एक वाजता रोहरू येथे पुरात ढाब्यासह एक घर वाहून गेले. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण बेपत्ता आहेत. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे. कुल्लूच्या गडसा खोऱ्यात ढगफुटीमुळे नाल्याला पूर आला होता. भूस्खलनामुळे खोडगे गावातील घरे रिकामी करण्यात आली.

दिल्लीतही हाय अलर्ट

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे हथिनीकुंड बॅरेजमधून 2 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने दिल्ली सरकार हाय अलर्टवर आहे. दिल्लीतील यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे राजधानीच्या पूरग्रस्त सखल भागात मदत आणि पुनर्वसन कार्यावर परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस

ठाणे, पालघर, रायगडसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, एसडीआरएफ व्यतिरिक्त, आनंदनगर तांडा गावात बचाव कार्यासाठी भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही5 हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे. एसडीआरएफने अडकलेल्या सुमारे 110 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.