कोरोना रुग्णांच्या संख्येत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर

कोरोना रुग्णांच्या संख्येत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Updated: Jul 5, 2020, 11:26 PM IST
कोरोना रुग्णांच्या संख्येत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर title=

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रविवारी भारतातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ६.९ लाखांपर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार रशियामध्ये कोरोनाचे ६.८ लाख रुग्ण आहेत. सध्या सर्वाधिक कोरोनाग्रस्त असणाऱ्या देशांमध्ये अमेरिका २८ लाख रुग्णांसह पहिल्या क्रमांकावर आणि ब्राझील १५ लाख रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

भारतामध्ये रविवारी कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली. एका दिवसात भारतात २५ हजारांपेक्षा थोडे कमी रुग्ण आढळले. तर ६१३ जणांचा मृत्यू झाला. भारतामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यात आढळला होता. भारतात आत्तापर्यंत १९,२६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी भारतामध्ये मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आलं. हा लॉकडाऊन मागच्या काही दिवसांमध्ये शिथील करण्यात आला. शाळा, रेल्वे, मेट्रो, चित्रपटगृह, जीम, स्विमिंग पूल, आंतरराष्ट्रीय विमानसेवा अजूनही बंदच आहे. 

सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे, तसंच मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. दुकानं आणि कार्यालयांनाही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं बंधनकारक आहे. 

आयसीएमआरकडून कोरोनाविरुद्धच्या लसीच्या परीक्षणाला परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही लस उपलब्ध करून द्यायचं आयसीएमआरचं लक्ष्य आहे. येत्या काही काळात भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या 
प्रमाणावर वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.