कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी दरवाढ; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

१९८८ नंतर प्रथमच एका रात्रीत तेलाच्या किंमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

Updated: Sep 16, 2019, 08:56 AM IST
कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी दरवाढ; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता title=

नवी दिल्ली: इराणच्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन तेल क्षेत्रांवर ड्रोन हल्ले केल्यानंतर आता कच्च्या तेलाच्या किंमतीत टक्के वाढ झाली आहे. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने ५० टक्के तेल उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. 

सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. दररोज साधारण ९८ दशलक्ष बॅरल कच्चे तेल सौदी अरेबियेतून निर्यात होते. या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीतही एका रात्रीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

परिणामी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव १०० डॉलर/बॅरल जाण्याची शक्यता आहे. सध्याचा कच्च्या तेलाचा भाव ६० डॉलर प्रती बॅरल आहे. भारतात कच्च्या तेलाच्या  एकूण आयातीपैकी १९ टक्के हिस्सा सौदी अरेबियातून येतो. त्यामुळे या दरवाढीचा फटका भारताला बसू शकतो. ही दरवाढ झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढतील. 

१९८८ नंतर प्रथमच एका रात्रीत तेलाच्या किंमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता कच्च्या तेलाच्या किंमतीमधील दरवाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरली आहे. सध्या अर्थव्यवस्थेचा विकासदर घालवल्यामुळे केंद्र सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्यामध्ये आणखीनच भर पडेल.