India To Acquire 97 Made In India Drones: चीन आणि पाकिस्तानच्या सीमांना लागून असलेल्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राष्ट्रांबरोबर सुरु असलेला वाद आणि दोन्ही देशांकडून सीमाभागामध्ये केल्या जाणाऱ्या कुरापतींना आळा घालण्यासाठी भारत आता ड्रोन्सची मदत घेणार आहे. सोमवारी सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संरक्षण दल चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी 97 'पूर्णपणे भारतीय बनवाटीची' ड्रोन्स वापरणार आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायूदल जवळजवळ 10 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करुन हे ड्रोन्स विकत घेणार आहे. हे ड्रोन्स एकदा उड्डाण केल्यानंतर जवळजवळ 30 तास हवेत गस्त घालू शकतात असं सांगण्यात आलं आहे.
भारताने काही दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून 31 ड्रोन्स विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, सर्वच संरक्षण दलांनी एकत्रितपणे एक वैज्ञानिक अभ्यास केला. या अभ्यासानंतर सर्व संरक्षण दालांचं असं एकमत झालं की, जमीन आणि समुद्री सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी 97 मीड रेंज ड्रोन्सची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या ड्रोन्सला 'मेक-इन-इंडिया'च्या माध्यमातून हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड आणि मूळ ड्रोन बनवणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने अपग्रेड करण्यात येणार आहे. हे ड्रोन्स साधेसुधे नसून छोट्या विमानांप्रमाणे दिसणारी आहेत.
10 हजार कोटींहून अधिक खर्च करुन अद्यावत केले जाणारे हे ड्रोन्स मागील काही वर्षांमध्ये तिन्ही सेना दलांमध्ये समावून घेण्यात आलेल्या हेरॉन यूएव्हीपेक्षा वेगळे असतील असंही सांगण्यात आलं आहे. सध्या भारतीय संरक्षण दलांकडून हेरॉन यूएव्ही ड्रोन्स वापरले जातात. आता हेच ड्रोन हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड अपग्रेड करुन घेणार आहे. यासाठी या ड्रोन्सची निर्मिती करणाऱ्या मूळ कंपन्यांचीही मदत हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या अंतर्गत येणारी कंपनी घेणार आहे. हे ड्रोन अपग्रेड करण्यासाठी 60 टक्क्यांहून अधिक भारतीय सामान वापरुन देशांतर्गत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
मागील काही काळापासून पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून भारतीय सीमाभागांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय संरक्षण दलाने हे प्रयत्न हाणून पाडले होते. यानंतरपासूनच भारत सरकार सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने ड्रोनवर आधारित सुरक्षा प्रणाली उभरण्याच्या प्रयत्नांना गती मिळल्याचं पहायला मिळालं. भारत सरकारसाठी काम करणाऱ्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या माध्यमातून ड्रोन आणि हत्यारांच्या निर्मितीसंदर्भातील संशोधन आणि काम केलं जातं. त्यामुळेच आता याच कंपनीच्या पुढाकाराने ड्रोन्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे.