बेळगाव: मराठा लाईट इन्फन्ट्रीला भारतीय लष्करात विशेष महत्त्व आहे. या रेजिमेंटमधील मराठी सैनिक कोणत्याही ठिकाणी आणि कितीही अवघड कामगिरी पार पाडण्यास सदैव सज्ज असतात. त्यामुळे मराठा सैनिक समोर आल्यावर शत्रूही चळाचळा कापतात, अशा शब्दांत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कौतुक केले.
१९१८ साली ब्रिटीशांच्या नेतृत्वाखाली तुर्की सैन्याविरुद्ध ११४ मराठी सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून दरवर्षी २९ ऑक्टोबरला मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटच्या मुख्यालयात 'शरकत डे' साजरा केला जातो. या सोहळ्याला लष्करप्रमुखांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात रेजिमेंटच्या जवानांना संबोधित करताना लष्करप्रमुखांनी म्हटले की, इन्फन्ट्रीला यावर्षी २५० वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षांत इन्फन्ट्रीच्या जवानांनी रणभूमीत प्रचंड मोठी कामगिरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आदर्श घेत ते युद्धभूमीत उतरतात. निडर होतात. शत्रूला भिडून त्यांनी अनेकदा विजयश्री खेचून आणली आहे. म्हणूनच मराठा सैनिकांविरोधात लढताना शत्रूही थरथर कापतो. पराक्रमाचा हा आलेख यापुढील काळातही असाच उंचावत जाईल, असे रावत यांनी सांगितले.