Nitin Gadkari: निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे आलेच. मात्र भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मात्र विरोधक फारशी टीका करत नाहीत, असे का? याचे उत्तर त्यांनी दिलं आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात त्यांनी यामागचे कारण सांगितले आहे.
नितीन गडकरी यांनी टु द पॉइंट कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीत या मागचे विरोधक गडकरींवर फारशी टीका करत नाहीत? या मागचं मॅजिक काय? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. गडकरी म्हणाले, 'मी काही कुशल राजकारणी नाहीये. मी सामान्य व्यक्ती आहे. माझे सर्वांशी संबंध चांगले आहेत. मी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो. एक म्हणजे, दोन रेषा आहेत एक आपली आणि एक दुसऱ्यांची. आपली मोठी करायची आणि दुसऱ्यांची पुसण्याचा प्रय़त्न केला की आपली मोठी होती. पण मी मी पहिले ठरवले आपली रेषा मोठी करायची. आपलं काम करायचं,' असं स्पष्ट उत्तर गडकरींनी दिलं आहे.
'दुसरं म्हणजे, आपला विचार काय आपली भूमिका काय हे लोकांना सांगायचं. दुसऱ्यांच्या भूमिकेवर जास्ती टीका करण्याची काही गरज नाही. महत्त्वाचा मुद्दा असेल तर सांगता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे, निवडून आल्यानंतर तुम्ही पक्षाचे नाही आहात तर त्या परिसराचे प्रतिनिधी आहेत. योग्य काम सगळ्यांचे करायचे. आलेल्या प्रत्येक माणसाशी चांगलं वागायचे. हे सर्व आम्हाला अटल बिहारी वाजपेयींकडून शिकायला मिळालं. मी अटल बिहारी वायजेयी व जॉर्ज फर्नांडिस या दोन नेत्यांना आयुष्यात खूप मानतो,' असं गडकरींनी म्हटलं आहे.
'मी खरोखरच नशीबवान आहे की, मला विरोध करणारा व्यक्ती जो काँग्रेसकडून उभा आहे. तो मला फोन करुन मला तुम्हाला भेटायचे आहे. मला तुमचा आशीर्वाद हवा, मी त्याला म्हटलं की मी तुम्हाला कशी मदत करु त्यावर. ते म्हणाले की, मला तुमची मदत नकोय पण तुमचा आशीर्वाद घेण्याचा अधिकार मला आहे. ते भेटले गेले मी काही त्यांना मदत नाही केली. कारण मी माझ्या पक्षाशी बांधिलकी आहे. शेवटी आम्ही एकमेकांचे विरोधक आहेत, दुष्मन नाहीत. एकमेकांमध्ये वैचारिक मतभिन्नता आहे व शत्रुत्व नाही. हे लक्षात ठेवलं तर राजकारण पुष्कळ चांगलं होईल, असं गडकरींनी म्हटलं आहे.