कोरोनाला अश्वगंधा हरवणार? ब्रिटनमध्ये अश्वगंधावर क्लिनिकल टेस्ट

कोरोना काळात औषध आणि लसींबाबत जगभर मोठं संशोधन सुरू आहे.

Updated: Aug 3, 2021, 09:39 PM IST
कोरोनाला अश्वगंधा हरवणार? ब्रिटनमध्ये अश्वगंधावर क्लिनिकल टेस्ट title=

मुंबई : कोरोना काळात औषध आणि लसींबाबत जगभर मोठं संशोधन सुरू आहे. कोरोनावर मात करण्यासाठी साऱ्या जगभरात प्रयोग सुरू असताना यात भारतीय आयुर्वेदिक औषधांनी देखील बाजी मारली आहे. अश्वगंधा  वनस्पतीपासून तयार केलेल्या औषधामुळं कोरोना रुग्णांना फायदा होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळं आयुर्वेदाचं महत्व आता पाश्चिमात्य देशांनाही पटू लागलंय.

आयुष मंत्रालयानं अश्वगंधावर अभ्यास करण्यासाठी ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनसोबत करार केला आहे. त्यानुसार ब्रिटनमधल्या तीन शहरांमधील 2 हजार लोकांवर अश्वगंधाच्या क्लिनिकल टेस्ट करण्यात येणार आहेत.

अश्वगंधाला सामान्यतः इंडियन विंटर चेरी म्हणून ओळखलं जातं. ही एक पारंपरिक भारतीय औषधी वनस्पती आहे. ज्यामुळे शरारीत ऊर्जा वाढते, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

भारतात अश्वगंधाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. कोरोनाची दीर्घकालीन लक्षणं कमी करण्यात अश्वगंधा उपयुक्त ठरलीय. त्यामुळे भारत आणि ब्रिटनच्या करारातून अश्वगंधावर आणखी संशोधन झाल्यास कोरोनाविरोधातल्या लढ्यात हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.