राफेल करारासाठी भारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले होते; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा गौप्यस्फोट

होलांद यांच्या खुलाशानंतर विरोधक आक्रमक

Updated: Sep 21, 2018, 09:43 PM IST
राफेल करारासाठी भारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले होते; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा गौप्यस्फोट title=

नवी दिल्ली: राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात दसॉल्ट एव्हिएशन कंपनीचा ऑफसेट भागीदार म्हणून भारताकडून रिलायन्सचे नाव सुचवण्यात आले होते, असा खुलासा फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा होलांद यांनी केला आहे. आम्हाला याप्रकरणात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. भारतीय सरकारने रिलायन्सचे नाव सुचविल्यानंतर दसॉल्ट कंपनीने त्यांच्याशी बोलणी केली. याबाबती आम्हाला निवडीचा कोणताही अधिकारी नव्हता. भारताने सुचवलेल्या मध्यस्थाशी आम्ही करार केल्याचे फ्रान्स्वा होलांद यांनी सांगितले. एका फ्रेंच संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे.
  
  मात्र, होलांद यांच्या या दाव्यामुळे राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या दाव्याला बळ मिळाले आहे. त्यामुळेच होलांद यांच्या खुलाशानंतर राहुल गांधींनी तातडीने पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर तोफ डागली. पंतप्रधान मोदींनी जातीने चर्चा करून राफेल करारात बदल केले. हे सर्व बंद दरवाजाआड घडले. कर्जात बुडालेल्या अनिल अंबांनीच्या कंपनीचे नाव भारतीय सरकारनेच सुचवले होते, हे स्पष्ट केल्याबद्दल मी होलांद यांचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची फसवणूक केली आहे. त्यांनी जवानांच्या रक्ताचा अपमान केला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.