नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे डॉक्टरांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने रेड अलर्ट जारी केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करायचा असल्यास सर्वप्रथम डॉक्टरांना त्यांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे.
आयएमएने म्हटलं आहे की, 'कोरोनाची प्रकरणं कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रथम स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. जर फ्रन्टलाईनवर उभे असलेले डॉक्टरचं आजारी पडले तर आरोग्याच्या सुविधाही डळमळीत होतील.'
इंडियन मेडिकल असोसिएशनने एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, कोरोना रुग्णांवर उपचार करतांना देशातील 99 डॉक्टरांनी आपला जीव गमावला असल्याचं म्हटलं आहे. आयएमएच्या आकडेवारीनुसार, कर्तव्यावर असताना 1302 डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला, त्यापैकी 99 जणांचा मृत्यू झाला.
ज्या 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला, त्यापैकी 73 डॉक्टर वयवर्ष 50 वरील होते. 19 डॉक्टराचं वय 35 ते 50 च्या दरम्यान होतं. तर 7 डॉक्टर असेही होते ज्याचं वय 35 वर्षाहून कमी होतं, असं सांगण्यात आलं आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या 1302 डॉक्टरांपैकी 586 प्रॅक्टिसिंग डॉक्टर, 566 रेजिडेंट डॉक्टर आणि 150 हाऊन सर्जन असल्याची माहिती आहे.