Indian Railway International Trains: रेल्वे प्रवास प्रत्येकासाठी अतिशय खास आणि अनेक आठवणी देऊन जाणार असतो. कधीकधी सहप्रवाशांमुळे प्रवास खास होतो, कधी प्रवासाची वाटच तो अधिक खास करते, कधी आपण ज्या ट्रेननं प्रवास करतोय ती कमाल असते अशी एक ना अनेक कारणं तुमचा प्रवास अविस्मरणीय करून जातात. देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणाऱ्या या भारतीय रेल्वेनं तुम्ही किती दूरवर गेलात? रेल्वेनं कधी देश ओलांडण्याचं धाडस तुम्ही केलं आहे का?
विविध देशांमध्ये जाण्यासाठी रेल्वे प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला परदेशांमध्ये जाण्याची गरज नाही. कारण, इथं भारतातूनच तुम्हाला दुसऱ्या देशांमध्ये जाण्याची संधी मिळेल, तेसुद्धा ट्रेननं.
मिताली एक्सप्रेस
जलपाईगुड़ी आणि सिलिगुडी येथून ही ट्रेन बांगलादेशचा ढाकापर्यंत जाते. आठववड्यातून एकदा धावणारी ही ट्रेन 513 किमीचं अंतर ओलांडते.
बंधन एक्सप्रेस
बंधन किंवा मैत्री एक्सप्रेस II अशी ओळख असणाऱ्या या ट्रेनची सुरुवात 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. कोलकाता येथून या रेल्वेचा प्रवास सुरु होऊन भारतात दमदम आणि बनगाव अशा स्थानकांवर ती थांबून पुढं पेट्रापोलची हद्द ओलांडते. बांगलादेशमध्ये झिकरगाछा आणि जशोरहून ही ट्रेन बेनापोल येथे जाते. व्हिसा मिळाल्यानंतर प्रवाशांना या ट्रेनचं तिकीट दिलं जातं. जिथं आरक्षण करतेवेळी पासपोर्ट दाखवणं बंधनकारक असतं.
मैत्री एक्सप्रेस
कोलकाता (Kolkata) आणि ढाकामध्ये धावणारी ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस प्रवाशांना सेवा देते. 375 किमीचा प्रवास करण्यासाठी ट्रेन कोलकात्याहून सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी निघते आणि ढाका येथे ती दुपारी 4 वाजून 5 मिनिटांनी पोहोचले. कोलकाता स्थानकाच्या तिकीट खिडकीवर या ट्रेनची तिकीटं घेता येतात.
थार लिंक एक्सप्रेस
जोधपूरच्या (Jodhpur) भगत कोठी रेल्वे स्थानकातून निघणारी ही ट्रेन बालोतरा-बाड़मेर-मनाबाओहून पुढं हैदराबाद-खोखरापार लाईन आणि कराची-पेशावर रेल्वे विस्तारासह प्रवास करत पाकिस्तानची हदद् ओलांडते. 381 किमी अंतराच्या प्रवासाठी या ट्रेननं 12 तास 15 मिनिटांचा प्रवास करावा लागतो.
समझौता एक्सप्रेस
(India Pakistan) अमृतसरच्या अटारी जंक्शनवरूनच या ट्रेनचं तिकीट खरेदी करता येतं. या तिकीटाचं आरक्षण ऑफलाईन पद्धतीनं होतं. या तिकीटासाठी तुम्हाला सर्वप्रथम पाकिस्तानच्या व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. हा व्हिजा मंजूर झाल्यानंतरच ट्रेनचं तिकीट मिळतं. भारतातून सकाळी 11.30 वाजना निघणारी ही ट्रेन 4 तास 10 मिनिटांचा प्रवास करून दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी लाहोरला पोहोचते. भारतात या रेल्वेचा एकच थांबा असून, पंजाबमधील वाघा स्थानकात ती थांबते. ही भारतातील सर्वात प्रतिष्ठीत रेल्वे गाड्यांपैकी एक आहे. सध्या भारत- पाकिस्तानमध्ये असणाऱ्या वादामुळं या रेल्वेवर बंदी घालण्यात आली आहे.