Indian Railway IRCTC : प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत प्रत्येक वर्गातील प्रवाशाला उत्तम सेवा पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन सदैव तत्पर असतं. याच तत्परतेनं रेल्वे विभागाच्या वतीनं प्रवाशांना रेल्वे सेवा पुरवण्यासोबतच त्यांना किफायतशीर दरात देशातील विविध ठिकाणी असणाऱ्या पर्यटनस्थळांना भेट देण्याचीही संधी दिली आहे. अशीच एक सुवर्णसंधी आता रेल्वे विभागानं पुन्हा एकदा प्रवाशांपुढं सादर केली असून, या माध्यमातून भारत गौरव टूरिस्ट ट्रेननं देशातील लोकप्रिय मंदिरांना भेट देता येणार आहे.
रेल्वेच्या या नव्या उपक्रमाअंतर्गत भाविकांना दक्षिण भारतातील मंदिरांची सफर करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये ज्योतिर्लिंगांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. 12 रात्री आणि 13 दिवसांसाठीच्या या प्रवासात ट्रेनमध्ये एसी आणि स्लीपर कोचची सुविधा असून, यामध्ये प्रत्येक व्यक्तीला 24450 रुपये इतका खर्च येणार आहे.
प्रवासखर्चामध्ये राहण्याची सोय, स्थानिक प्रवास, नाश्ता आणि जेवणाची सोय रेल्वे विभागाकडून केली जाईल. एकहाती रक्कम न भरू शकणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनं EMI ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळं आता पैशांची चिंता न करता मनसोक्त भटकंतीचीच संधी रेल्वे विभागत देत आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
13 ते 25 जुलै दरम्यानच्या या प्रवासामध्ये गोरखपूरहून सुरू होणारा हा प्रवास कप्तानगंज थावे, सिवान, छपरा, बनारस, प्रयागराज, प्रतापगड, रायबरेली, लखनऊ, कानपुर, वीरांगना लक्ष्मीबाई, ललितपुर रोखानं पुढे जाईल. या प्रवासामध्ये रामेश्वरम, मीनाक्षी मंदिर, तिरुपती, मल्लिकार्जुन अशा मंदिरांना भेट देता येणार असून, प्रवासादरम्यानचं जेवण शुद्ध शाकाराही स्वरुपातील असेल. स्थानिक ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रवाशांना एसी बसची सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करून दिली जाईल.
माणसी शुल्क 24450 रुपये असून, 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी 23000 रुपये शुल्क असेल. स्टँडर्ड श्रेणी थर्ड एसीसाठी माणसी40,850 रुपये; सेकंड एसीसाठी माणसी 54,200 रुपये इतका खर्च येईल. प्रवाशांना यामध्ये एलडीसी आणि इएमआय सारख्या सुविधाही उपलब्ध असतील. ज्यानुसार दर महिन्याला 1150 रुपयांचा हफ्ता भरावा लागेल असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. IRCTC च्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असून, तिथंच सरकारी आणि खासगी बँकांचे पर्याय आहेत. या प्रवासासंदर्भातील सविस्तर माहितीसाठी 8595924274 (बनारस), 8595924273 (गोरखपुर), 8445137807 (लखनऊ), 8595924298 (कानपुर) आणि 8595924291 (झांसी) या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.