Indian Railway Ticket Booking For Pets: रेल्वे प्रवासात आता आपल्या आवडत्या प्राण्यांना सोबत घेऊन जाता येणार आहे. कारण रेल्वेकडून पाळीव प्राण्यांसाठी तिकीट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वे पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाईन तिकीट सुविधा लवकरच सुरु करत आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांना आता रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.
भारतीय रेल्वेने पाळीव श्वान आणि मांजरांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सुरु करण्याचा विचार करत आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने नुकताच तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास रेल्वे प्रवासी कोणत्याही त्रासाशिवाय आपल्या पाळीव प्राण्यांना प्रवासात सोबत घेऊन जाऊ शकतील. दरम्यान, पाळीव प्राण्यांच्या बुकिंगचे अधिकार टीटीईला देण्याचाही विचार रेल्वे मंत्रालय करत आहे.
रेल्वे प्रवासात पाळीव प्राण्यांना नेत असताना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. सर्व आकाराच्या प्राण्यांसाठी नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याला तुमच्यासोबत रेल्वेच्या प्रवासात घेऊन जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
पाळीव प्राण्यांसाठी तिकीट बुक केल्यानंतर त्याची छायाप्रत काढा आणि तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी सर्व लसीकरण पूर्ण केले पाहिजे. याबाबतची सर्व प्रमाणपत्रे जवळ ठेवली पाहिजेत आणि प्रवास करण्याआधी अर्थात 24-48 तास आधी पशुवैद्यकाकडून फिटनेस प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच, संबंधित ओळखपत्र सोबत असायला हवे. त्यांचा प्रवास आरामदायी राहण्यासाठी त्यांच्या प्रवासादरम्यान व्यस्त ठेवण्यासाठी पाणी, अन्न आणि त्यांची आवडती खेळणी सोबत असावीत.
यापूर्वी, प्रवाशांना एसीच्या पहिल्या डब्यामध्ये दोन किंवा चार बर्थसह पूर्ण कूप बुक करावे लागत होते आणि शुल्क देखील खूप जास्त होते. कुत्र्याला श्वान डब्यात वाहून न्यायचे असल्यास, ट्रेनला लागू असलेल्या सामानाच्या दरानुसार प्रति कुत्रा 30 किलो दराने शुल्क आकारले जात होते. ते एसी फर्स्ट क्लासमध्ये 60 किलो प्रति कुत्र्यासाठी देखील नेले जाऊ शकतात.परंतु, त्यांना एसी 2 टायर, एसी 3 टायर, एसी चेअर कार, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास कंपार्टमेंटमध्ये परवानगी नव्हती. तसेच एखाद्या प्रवाशाने त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी तिकीट बुक केले नसेल तर त्याकडून मोठा दंड आकारला जात होता. हा दंड टीटीई तिकिटाच्या सहापट आकारत असे. त्यामुळे रेल्वेची अधिकृत पाळीव प्राण्यांसाठी तिकीट सुविधा उपलब्ध झाली तर यातून सुटका होणार आहे.