नवी दिल्ली: येत्या १ तारखेपासून रेल्वेकडून दररोज २०० ट्रेन चालवण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली. या २०० ट्रेन बिगरवातानुकूलित (नॉन एसी) असतील. या ट्रेनच्या तिकिटांच्या ऑनलाईन बुकिंगला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती पीयूष गोयल यांच्याकडून देण्यात आली. या गाड्यांमध्ये वेटिंग लिस्टचा पर्याय असेल. मात्र, तात्काळ किंवा प्रीमियम तिकिटाचे पर्याय उपलब्ध नसतील, असे रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय, स्थलांतरित मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक रेल्वे गाड्यांबद्दल माहिती देताना गोयल यांनी सांगितले की, आतापर्यंत एकूण १६०० श्रमिक ट्रेन चालवण्यात आल्या. या ट्रेनमधून २१.५ लाख कामगारांना इच्छित स्थळी सोडण्यात आले.
इसके अतिरिक्त भारतीय रेल 1 जून से टाइम टेबल के अनुसार प्रतिदिन 200 नॉन एसी ट्रेन चलायेगा जिसकी ऑनलाइन बुकिंग शीघ्र ही शुरु होगी।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 19, 2020
सध्याच्या घडीला प्रत्येक दिवशी जवळपास २०० श्रमिक ट्रेन सोडल्या जात आहेत. आता प्रत्येक राज्याने त्यांची जबाबादारी पार पाडावी. प्रत्येक राज्याने रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर मजुरांच्या नावांची नोंदणी करावी. ही यादी रेल्वे विभागाला दयावी. जेणेकरून रेल्वे विभागाला या कामगारांना त्यांच्या राज्यात सोडता येईल. त्यामुळे सध्या मजुरांनी संयम बाळगावा. त्यांनी आहे त्याचठिकाणी थांबावे, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
सध्या रेल्वेकडून राजधानी मार्गावरील रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. या सर्व गाड्या वातानुकूलित असून त्या पूर्ण क्षमतेने चालवल्या जात आहेत. ११ मे पासून या गाड्यांच्या तिकीटांच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली होती. तिकीट विक्रीसाठी प्रवाशांची झुंबड उडाल्याने IRCTC चे संकेतस्थळ क्रॅश झाले होते.