नवी दिल्ली : कोरोनाला मात देण्यासाठी देशभरात कोरोना चाचण्यांची वाढ करण्यात भर देण्यात येत आहे. याच दरम्यान सोमवारी देशात तीन हाय कॅपॅसिटी असणाऱ्या तीन लॅबचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे सोमवारी नोएडा, मुंबई आणि कोलकाता स्थित लॅबचं उद्घाटन केलं. या लॅबच्या माध्यमातून सुमारे 10 हजार चाचण्या केल्या जाऊ शकतात.
जानेवारी महिन्यात देशात कोरोना टेस्टसाठी केवळ एक सेंटर होतं. मात्र आज जवळपास 1300 प्रयोगशाळा संपूर्ण देशभरात कार्यरत आहेत. आज भारतात 5 लाखहून अधिक टेस्ट दर दिवशी होत आहेत. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये हे प्रमाण 10 लाख प्रतिदिन करण्याचा प्रयत्न असल्याचं, पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
भारताने एका दिवसांत पाच लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्याचा रेकॉर्ड केला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात विविध चाचणी केंद्रांवर 5,15, 472 कोरोना चाचण्यांची तपासणी करण्यात आली.
कोरोनाविरोधातील ही मोठी लढाई लढण्यासाठी देशात कोरोना स्पेसिफिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. आयसोलेशन सेंटर, कोविड स्पेशल हॉस्पिटल, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग नेटवर्क या सर्व बाबींमध्ये भारताने आपल्या क्षमतांचा वेगाने विस्तार केला आहे. आज भारतात 11 हजारहून अधिक कोविड फॅसिलिटीज असून 11 लाखांहून अधिक आयसोलेशन बेड्स असल्याचं, मोदींनी सांगितलं. त्याशिवाय देशात पॅरामेडिकल स्टाफ, आंगणवाडी, सिव्हिल वर्कर्स, आशा वर्कर्स या सर्वांना अतिशय कमी वेळेत प्रशिक्षित करण्यात आलं, हे अभूतपूर्व असल्याचंही ते म्हणाले.