नवी दिल्ली : एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात विक्रमी वाढ झालीये. गेल्या २ वर्षांतल्या तिमाही वाढीचे आकडे मोडीत काढत भारतानं ८ पूर्णांक २ टक्क्यांचा जीडीपी नोंदवलाय. प्रामुख्यानं औद्योगिक उत्पादन आणि शेतीमध्ये झालेल्या वाढीचा जीडीपीला मोठा फायदा झालाय.
या आकडेवारीमुळे सर्वाधिक वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था हा आपला खिताबही भारतानं कायम ठेवलाय. याच तिमाहीमध्ये चीनचा विकासदर ६ पूर्णांक ७ टक्के राहिलाय. नोटाबंदी आणि राफेल खरेदीवरून विरोधक रान उठवत असताना आलेली ही आकडेवारी केंद्र सरकारला मोठा दिलासा देणारी आहे. यामुळे आता यंदाच्या आर्थिक वर्षात ७ पूर्णांक ५ टक्के विकासदर गाठण्याची शक्यता बळावल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलंय.