आयुष्य संपवण्यासाठी 18 वर्षांच्या युवकानं मागवल्या Online गोळ्या

पैशांच्या चणचणीतून टोकाचं पाऊल? ऑनलाईन गोळ्या मागवून संपवलं आयुष्य...

Updated: Aug 21, 2021, 10:45 PM IST
आयुष्य संपवण्यासाठी 18 वर्षांच्या युवकानं मागवल्या Online गोळ्या title=
नवी दिल्ली: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष बाजारात जाऊन वस्तू विकत घेण्याऐवजी घरातून ऑनलाईन ऑर्डर करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अगदी घरातील किराण्यापासून ते गोळ्या औषधांपर्यंत वेगवेगळ्या ऑनलाइन साइटवरून वस्तू खरेदी केल्या जातात. पण याचा उपयोग एका युवकानं आपलं आयुष्य संपवण्यासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 
 
ऑनलाइन साईटवरून औषध मागवून तरुणानं आयुष्य संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्याने गोळ्या घेतल्यानंतर त्याची तब्येत खूप जास्त खालवली. या तरुणाला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 
या तरुणाच्या आई-वडिलांनी या ई-कॉमर्स वेबसाईट विरोधात आता तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. या मृत तरुणाच्या आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलीस सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मध्ये प्रदेशातील इंदौर शहरात घडली आहे. मृत तरुणाचे वडील रंजीत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलावर 2 लाख रुपये देणं होतं. त्याचा दबाव आणि त्यातून होणाऱ्या मानसिक त्रासातून त्याने हे पाऊल उचललं असावं अशी शंका व्यक्त केली आहे. विना प्रिस्क्रिप्शन ऑनलाइन गोळ्या देण्यासाठी देखील त्यांनी यावेळी विरोध दर्शवला आहे.