नवी दिल्ली : सीईओंनी राजीनामा दिल्यानंतर इन्फोसिसचे शेअर्स गडगडले.
यामुळे गुंतवणूकदारांचे अवघ्या ४० मिनीटात १७ हजार कोटी रुपये गेल्याची स्थिती निर्माण झाली. इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचे शेअर्स खाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बुधवारी शेअर्स बायबॅकच्या बातमीनंतर बीएसई आणि एनएसईवर इन्फोसिसचा शेअर्स ४ टक्क्याच्या वाढीने बंद झाला होता. पण आज सकाळी सिक्का यांच्या राजीनाम्याची बातमी शेअर बाजारात पोहोचली तेव्हा शेअर्समध्ये ७ टक्क्यांनी उतार आल्याचे पाहायला मिळाले.
कंपनीचे मार्केट कॅप २.३५ लाख कोटी रुपयांनी खाली येत २.१८ लाख कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या शेअर्सची किंमत १७ हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
इन्फेसिसच्या शेअर्सवर एकदा नजर टाकली तर गेल्या आठवड्यात ३ टक्क्यांनी गडगडला होता. तसेच एका महिन्यात ३ टक्क्यांनी उतरला आहे. गेल्या एक वर्षातही शेअरने ८ टक्क्यांनी निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत.
कंपनीच्या गुंतवणूकदारांना कोणताच धोका नाहीए. गुंतवणूकदारांनी न घाबरता परिस्थिती शांत होण्याची वाट पाहावी असे एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे.