Fastag : गाडीला फास्टॅग नसेल....तर मिळणार नाही विमा

1 एप्रिलपासून निर्णय लागू 

Updated: Mar 9, 2021, 07:32 PM IST
Fastag : गाडीला फास्टॅग नसेल....तर मिळणार नाही विमा title=

मुंबई : आता फास्टॅग नसलेल्यांना चाप लावण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयानं नवी शक्कल लढवली आहे. ज्या चारचाकी वाहनांवर फास्टॅग नसेल, अशा वाहनांना विमा म्हणजेच इन्शुरन्स दिला जाणार नाही आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला आहे.

1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून प्रत्येक चारचाकी वाहनांवर फास्टॅग अनिवार्य केला आहे. मात्र तरीही काही जणांनी फास्टॅग लावलेला नाही. त्यामुळे फास्टॅग सक्ती करण्याकरता त्याला विमासोबत जोडण्याची शक्कल सरकारने लढवली आहे.

जेव्हा वाहनाचा विमा काढला जाईल, तेव्हा कंपन्या वाहन क्रमांकाच्या आधारावर फास्टॅगचा लेझर कोड तपासतील. जेणेकरून चारचाकीवर फास्टॅग लावला आहे की नाही याची शाहनिशा होईल. जर कुठला विमा हा 31 मार्च 2021 नंतर संपत असेल, तर तो रिन्यू करतानाही फास्टॅगची अट कायम असणार आहे.

अशाप्रकारे हळूहळू वाहनांशी निगडीत सर्वच गोष्टी फास्टॅगशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पार्किंग शुल्कही फास्टॅगद्वारे घेण्याची योजना राबवण्याचे विचाराधीन आहे. सध्या 25 कोटीहून अधिक वाहनांना फास्टॅग लावण्यात आल्याची माहिती मिळतेय.