Delhi Riots: नाल्यात सापडला गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह

बराच वेळ होऊनही... 

Updated: Feb 27, 2020, 10:22 AM IST
Delhi Riots: नाल्यात सापडला गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : (IB) गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीचा दिल्ली हिंसाचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. बुधवारी त्यांचा मृतदेह दिल्लीतील चाँदबाग भागातील एका नाल्याच सापडल्याची माहिती समोर आली आहे. 

मंगळवारपासून २६ वर्षीय अंकित शर्मा बेपत्ता होते. याप्रकरणासंबंधी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दगडफेकीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. ज्यानंतर त्यांचा मृतदेह गुरु तेग बहाद्दर रुग्णालयात नेण्यात आला. 

गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या शर्मा यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंकित शर्मा घरी परतले. परिस्थितीविषयी माहिती मिळताच लगेचच ते घराबाहेरही पडले. पण, त्यानंतर त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही. बराच वेळ होऊनही त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. त्यांनी रुग्णालयातही धाव घेतली पण, तिथेही त्यांच्याविषयी काहीच माहिती मिळू शकली नाही, अशी माहिती 'आऊटलूक'ने प्रसिद्ध केली. 

Delhi Violence: Intelligence Bureau Officer Found Dead in Chand Bagh

बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारासही त्यांचा शोध सुरुच होता. पुढे सकाळी १० वाजता चाँदबाग नाल्यात त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ माजली. त्याला कोणी असं मारेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं, असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं. नशिब आपल्याशी इतकी वाईट खेळी खेळेल याची कल्पनाही नसल्याचं म्हणत शर्मा यांच्या आईने दु:ख व्यक्त केलं. 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

२०१७ मध्ये शर्मा यांनी गुप्तचर यंत्रणेमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. मंगळवारपासून दिल्लीतील चाँदबाग आणि इतर काही भागांमध्ये सीएएच्या मुद्द्यावर उसळलेल्या हिंसाचारामध्ये मारल्या गेलेल्यांमध्येच शर्मा यांनाही आपले प्राण गमवावे लागले. ही एकंदर परिस्थिती पाहता शहरात अनेक भागांत तणावाची परिस्थिती कायम आहे.