मोठी बातमी! शिवसेनेत अंतर्गत कलह, बैठकीत खासदारांनी वाचला तक्रारींचा पाढा

वेळीच सावध झालं नाही तर... नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेना खासदारांचा इशारा

Updated: Apr 5, 2022, 09:13 AM IST
मोठी बातमी! शिवसेनेत अंतर्गत कलह, बैठकीत खासदारांनी वाचला तक्रारींचा पाढा title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) सर्व काही आलबेल असल्याचं सांगितलं जात असलं तरी या ना त्या कारणाने धुसफूस सुरुच आहे. आता शिवसेना (ShivSena) खासदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खासदारांच्या नाराजीची कारणं
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या बैठकीत खासदारांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. शिवसेना मंत्री कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत, शिवसेना कमकुवत होत चालल्याचंही खासदारांनी बोलून दाखवलं. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) भेटत नसल्यानंही खासदार नाराज आहेत.

पक्षाला वेळीच बळकटी दिली नाही तर निवडणुका लढवणं कठिण होईल असा इशाराही या बैठकीत शिवसेना खासदारांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्रास दिला जात असून सेना आमदारांना निधी दिला जात नसल्याचा मुद्दाही याबैठकीत खासदारांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसेना आमदारांना योग्य वागणूक देत नाहीत असा सूरही या बैठकीत खासदारांनी लावला. यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून आणू असं आश्वासन खासदारांना दिलं.

शिवसेना खासदारांची काल नवी दिल्लीत बैठकी झाली. काल संध्याकाळी  सुरु झालेली बैठकी रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु होती. मराठावाडा आणि विदर्भात राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानातून नेमकी काय परिस्थिती आहे हे खासदारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आला.