नवी दिल्ली : परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठीचे नियम शिथिल केल्यानंतर, भारत नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु करण्याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी रविवारी दिली.
नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटमध्ये सांगितलं की, परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठीच्या नियमांमध्ये सूट देण्यात आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसंच इतर देशही येणारी उड्डाणं मंजूर करण्यासाठी तयार असणंही आवश्यक आहे. कोरोना व्हायरसमुळे जपान आणि सिंगापूर यांसारख्या देशांनी परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
आता सध्या पूर्णपणे, नियमितरित्या आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु होण्यासाठी वेळ लागू शकत असल्याचंही पुरी म्हणाले. देशातील अनेक मेट्रो शहरं सध्या रेड झोनमध्ये आहेत, त्यामुळे बाहेरच्या देशातील लोक विमानांच्या उड्डाणांसाठी येऊ शकत नाहीत. तसचं भारतात आल्यानंतर त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.
त्याशिवाय, देशांतर्गत उड्डाणांनाही 50 ते 60 टक्क्यांवर पोहचवण्यासाठी काही अवधी लागू शकतो. शिवाय उड्डाणांदरम्यान कोरोना व्हायरसचा प्रभाव कितपत होतो हेदेखील पाहावं लागणार आहे. तोपर्यंत सरकार वंदे भारत मिशनअंतर्गत लोकांना परदेशातून भारतात आणणार आहे.
A decision to resume regular international operations will be taken as soon as countries ease restrictions on entry of foreign nationals. Destination countries have to be ready to allow incoming flights.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) June 7, 2020
एअर इंडियाने 5 जूनपासून वंदे भारत मिशनअंतर्गत अमेरिका आणि कॅनडासहित इतर देशांमध्ये जाण्याऱ्या प्रवाशांसाठी बुकिंग सुरु केलं आहे. सरकारच्या वंदे भारत मिशनअंतर्गत 5 जूनपासून बुकिंग करुन 9 ते 30 जूनपर्यंत प्रवास करता येणार आहे. ही विमानं अमेरिका आणि कॅनडामधील महत्त्वपूर्ण शहरं न्यूयॉर्क, शिकागो, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, टोरंटोसाठी उपलब्ध होणार आहेत.
भारतात 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणांना परवानगी देण्यात आली. त्याआधी जवळपास दोन महिने, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती.