आयएनएक्स मीडिया: पी चिदंबरम यांना अटक, आज न्यायालयात हजर करणार

पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री सीबीआयने अटक केली.

Updated: Aug 22, 2019, 06:46 AM IST
आयएनएक्स मीडिया: पी चिदंबरम यांना अटक, आज न्यायालयात हजर करणार title=
Pic Courtesy: ANI

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.  आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांची सीबीआय पथकाने आधी तब्बल दीड तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

काहींना खूश करण्यासाठी कारवाई – कार्ती चिदंबरम

चिदंबरम यांच्या घराचे गेट बंद ठेवण्यात आल्याने त्यावरून उड्या मारून सीबीआय टीम आत गेली आणि सीबीआयने अटकेची कारवाई केली. हा 'हायव्होल्टेज ड्रामा' सुरू असताना चिदंबरम यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी सरकारच्या विरोधात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्या दुपारी २ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, त्यांना अटक करण्यापूर्वी पी चिदंबरम यांनी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा आरोपी नाही. आमच्यावर कोणतेही आरोपपत्रे दाखल करण्यात आलेले नाही. आम्हाला या घोटाळ्यात गोवले गेले आहे. आमच्यावरील सर्व आरोप खोटे असून तपास यंत्रणांनी कायद्याचे पालन करावे, असे पी चिदंबरम म्हणाले होते. त्यानंतर काही वेळात सीबीआयने त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली.